- धारगळ साईबाबा मंदिरात उद्या वर्धापनदिन महोत्सव
दाडाचीवाडी – धारगळ येथील श्री साईबाबा मंदिरातील श्री गणेश, श्री साईबाबा आणि श्री स्वामी समर्थ मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिन महोत्सव शुक्रवार २२ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांनिशी साजरा होणार आहे.
यानिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक विधी, लघुरुद्र, अभिषेक होईल. तद्नंतर श्री साई पूजा होईल.
दुपारी गोमंत साई सेवक, सांगोल्डा मंडळाचे भजन साईभक्त दशरथ (जया) तारी यांच्यातर्फे होणार आहे. तसेच आरती, महाप्रसाद होईल. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. यावेळी संस्थानसाठी भजन साहित्य प्रदान केलेल्या महाराष्ट्राचे माजी मत्री आणि आमदार दीपकभाई केसरकर, आगरवाडा – चोपडे पंचायतीचे सरपंच भगिरथ गावकर, पंकज विठ्ठल गावकर यांचा गौरव करण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता श्री संतोषी माता दशावतारी नाट्यमंडळ, मातोंड – वेंगुर्ला यांचा ‘श्री साईसमर्थ महिमा’ हा नाट्यप्रयोग साईभक्त जयवंत गोवेकर ( मांद्रे ) यांच्यातर्फे सादर होणार आहे.
सर्वांनी उपस्थित राहून श्री कृपेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा मंदिर विश्वस्त न्यासचे अध्यक्ष सुधाकर ( मामा ) पाडलोसकर यांनी केले आहे.