म्हापसा दि. 27 ( प्रतिनिधी )
तृणमूल पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष तथा पक्षाचे हळदोणा मतदार संघांचे उमेदवार किरण कांदोळकर यांनी म्हापसा उमेदवार तारक आरोलकर, पर्वरी मतदार संघाचे उमेदवार संदीप वझरकर, शिवोली मतदार संघाचे उमेदवार लिओ डायस व इतर कार्यकर्त्यांसोबत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.
म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हि माहिती दिली. गोव्यात तृणमूल काँगेस पक्षाला काही भवि्तव्य नसल्याचे निवडणुकीनंतर लक्षात आल्याने आपण हा निर्णय घेतला. तृणमूल पक्ष हा चांगला पक्ष असला तरी गोवेकर त्याला स्वीकारणार नाही हे उमगले आहे.गोव्यात तृणमूल पक्षाने प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या कंपनीला गोव्यात पक्ष बांधणीकरिता पाठवले होते पण प्रशांत किशोर याने सोनिया गांधी यांना दणका देत भाजपाला सत्तेवर येण्यासाठी अप्रत्यक्षरित्या सहकार्य केले. आपल्याला पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांना कधीही भेटू दिले नाही किंवा निवडणुकीच्या काही दिवस अगोदर प्रचाराकरिता त्यांना गोव्यात बोलावले नाही. प्रशांत किशोर यांनी दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांना भुलून आणी दाखवलेल्या अमिषानां भुलून पक्षात प्रवेश केला होता पण ती आपली चूक होती.
तृणमूल पक्षाबद्दल आपला काही राग नाही पण प्रशांत किशोर यांच्या मुळे पक्षाची गोव्यात खराब अवस्था झाली. निवडणुकीला आठ दिवस असताना प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीने गाशा गुंडाळून पलायन केले.गोव्यातील पक्षाची स्थिती ममता बॅनर्जीना कळावी म्हणून कलकत्त्याला गेलो पण आपल्याला भेटू देण्यात आले नाही. प्रशांत किशोर यांच्या आयपॅक कंपनीने गोव्यात केलेली देणी घेण्याकरिता त्यांनी अध्यक्ष म्हणून आपल्या दारी येण्यास सुरवात केल्याने आपण त्याच्याशी संपर्क साधला असता प्रशांत किशोर यांनी आयपॅकशी आपला काही संबंध नाही असे सांगून हात वर केले.
पुढे कोणत्या पक्षात जायचे ते अद्याप ठरवलेले नाही,यापुढेही आपण समाज कार्य सुरू ठेवणार आहे असे किरण कांदोळकर यांनी सांगितले.