लौकिक आणि विश्वासार्हतेचं शतक!
एबीपी समूहाचं शतकमहोत्सवी अभियान
१०० वर्षांच्या गौरवशाली परंपरेच्या सन्मानार्थ लोगो आणि फिल्मचं प्रकाशन
गोवा, ५ मे २०२२ : भारतीय माध्यमांच्या क्षितिजावर स्वत:चं अढळ स्थान निर्माण केलेल्या एबीपी समूहानं आज आपल्या लौकिक आणि विश्वासार्हता टिकवून ठेवण्याच्या शतकीय प्रवासाचं प्रतिबिंब ठरावं अशा अभियानाची सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून शतकमहोत्सवी लोगो आणि फिल्मचं अनावरण करण्यात आलं आहे. एबीपीच्या पायाभूत संकल्पना आणि धारणा यांच्या पायावर झालेली आजवरची शतकीय वाटचाल या दोन्ही अभिव्यक्तींमधून ठळकपणे मांडण्यात आली आहे.
एबीपी समूहाच्या शतकमहोत्सवी अभियानाचा महत्त्वाचा भाग असलेली फिल्म बोधकथा स्वरुपात सादर करण्यात आली आहे. अज्ञाताचा निर्भय शोध एका लहान बालकाच्या दृष्टीतून दाखवण्याची अनोखी कल्पना या फिल्ममध्ये वापरण्यात आली आहे. एका परीनं देशाचा भूगोल, वैविध्यपूर्ण संस्कृती, पाळंमुळं आणि परंपरा यांना कवेत घेणाऱ्या अलौकिक प्रवासाची ही कहाणी आहे. एबीपी ब्रँडच्या आजवरच्या वाटचालीचा सारांश या फिल्ममध्ये मांडण्यात आला असून, जिज्ञासेतून सुरु होणारा प्रवास हा जिज्ञासेच्या दिशेनं झेपावतो आहे आणि तेच त्याचं अंतिम ध्येय आहे हे या फिल्ममध्ये अधोरेखित करण्यात आलं आहे.
एबीपी समूहाच्या शतकमहोत्सवी अभियानाच्या लोगोचंही आज अनावरण करण्यात आलं. ‘विश्वातली प्रत्येक गोष्ट रंजक करण्याचं सामर्थ्य जिज्ञासेत असतं’ ही लोगोमधून मांडण्यात आलेली संकल्पना एबीपी ब्रँडच्या धारणेशी घट्ट नातं सांगणारी आहे. एबीपी समूहाच्या नव्या लोगोचा आकृतीबंध हा प्रश्नचिन्हाचा आहे. त्या प्रश्नचिन्हात मानवी चेहरा दाखवण्यात आला असून, हा मानवी चेहरा प्रत्येक आकृतिबंधानुसार बदलत जातो. एबीपीच्या शतकमहोत्सवी लोगोमध्ये मानवी चेहरा वापरण्याच्या संकल्पनेतून मानवी प्रगतीचं सार दाखवण्यात आलं आहे. मानवाचं जगणं हे फक्त श्वास घेण्यापुरतं मर्यादित नसतं तर मनाला प्रश्न पडण्याची नैसर्गिक वृत्ती हीदेखील माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे, हेच या लोगोतून स्पष्ट होतं.
शतकमहोत्सवी अभियान आणि नवीन लोगोबद्दल तपशीलवार माहिती देताना एबीपी प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ श्री. ध्रुव मुखर्जी यांनी सांगितले, “एबीपी ग्रुपचा शतकमहोत्सवी लोगो हा एका प्रश्नचिन्हाच्या स्वरूपात सादर करण्यात आला आहे. मनात कुतूहल असेल तर जगण्यातील प्रत्येक गोष्ट ही रंजक बनते, हे या लोगोतून मांडण्यात आलं आहे. एबीपीचा प्रभाव दाखवून देणाऱ्या अनेक बाबी आहेत. पण जिज्ञासा किंवा कुतुहलाची भावना त्या सर्वात श्रेष्ठ आहे. त्याच जिज्ञासेची सहावं ज्ञानेंद्रिय अशी ओळख करून देण्यात येत असली तरी मानवी जीवनात तिचं स्थान पहिलं आहे. जिज्ञासा ही माणसाला नवी गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेरित करते. आम्ही असं मानतो की, हा लोगो साऱ्या माध्यमविश्वात, येणाऱ्या अनेक दशकांमध्ये जगभरात आमच्या ब्रँडची ओळख बनेल. हाच विश्वास कायम राखून, शतकमहोत्सवी वर्षांच्या निमित्तानं आम्ही अभिमानानं सांगू इच्छितो की, भविष्यातही आम्ही आजवरच्या गौरवशाली वारशाशी इमान राखून वाटचाल करू.
एबीपी नेटवर्कचे सीईओ श्री अविनाश पांडेय यांनीही यावेळी आपले विचार व्यक्त केले: “जिज्ञासेची १०० वर्षे हा एबीपी समूहाचा भक्कम पाया आहे आणि या शतकीय वाटचालीत आम्ही सखोल आणि विश्वासार्ह माहिती देऊन विचारांना आकार देण्याच्या दृष्टीनं नेहमीच प्रयत्नशील राहिलो आहोत. एबीपी म्हणजे विश्वासार्हता आणि निष्पक्ष कन्टेन्ट हे समीकरण सुरुवातीपासूनच खरे ठरले आहे. भविष्यातही आम्ही आमच्या वारशाशी इमान राखू, हे दुसऱ्या शतकाची वाटचाल सुरु करताना आम्ही सांगू इच्छितो. एक सुजाण आणि सशक्त विचारांचा समाज अधिकाधिक मजबूत होत राहावा या दृष्टीनं अथक प्रयत्न करण्यासाठीही आम्ही वचनबद्ध आहोत. शतकमहोत्सवी अभियानाच्या निमित्तानं एबीपी समूह आपली मूळ उद्दिष्ट्ये आपल्या वाचक, प्रेक्षक आणि हितचिंतक यांच्यासह आजच्या आणि उद्याच्या प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवून त्यांना पुढील शतकाच्या वाटचालीत सामील करून घेऊ इच्छितो.”
एक संस्था या नात्याने एबीपी ग्रुपने सामाजिक परिवर्तनाला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे आणि आपल्या अभिनव धोरणांमधून पत्रकारितेतील सर्वोत्तमतेची उद्दिष्टे आखली आहेत. ‘तुम्ही जो वारसा निर्माण करता त्या जीवनाचे तुम्ही नेतृत्व करता’ या विचाराला अनुसरून एबीपी समूहानं आपल्या गेल्या शंभर वर्षांच्या वाटचालीत संशोधनाला आणि नव्या प्रतिभेला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.
शतकमहोत्सवी अभियानाची मूळ संकल्पना कुतूहल, प्रश्न आणि उत्तरं या तीन शब्दांवर आधारलेली आहे.
लोकशाही समाजामध्ये प्रश्न महत्त्वाचे का आहेत, प्रत्येक छोटे, मोठे यश प्रश्नांमधून जन्म घेते हे दर्शवणाऱ्या अनेक वेगवेगळ्या, विचार प्रवृत्त करायला लावणाऱ्या लिखित व दृश्य स्वरूपात प्रस्तुत करण्यात आलेल्या गोष्टींमार्फत एबीपी ग्रुपच्या वाचकांना, दर्शकांना आणि व्यवसाय भागीदारांना प्रेरित करणे हा शताब्दी समारोहाचा उद्देश आहे.
नव्या लॉन्चमागील संकल्पना विशद करताना ख्यातनाम क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि लेखक, तसेच लोगोचे डिझाईन व अभियान घडवण्यात ज्यांचे मोलाचे योगदान आहे असे अग्नेलो डायस यांनी सांगितले, “एबीपी ग्रुपच्या वाटचालीचा आढावा घेणारी एक फिल्म सिनेमॅटिक बोधकथा स्वरूपात बनवली गेली आहे. एका अज्ञात स्थळाच्या शोधात निघालेल्या एका लहान मुलाच्या नजरेतून हा सिनेमा साकार होतो. अतिशय अस्सल, अपरिपक्व आणि निरागस भावना यामधून झिरपावी असा आमचा उद्देश होता. ब्रँड लोगोभोवती विणलेले हे संपूर्ण अभियान या गोष्टीचे संक्षिप्त चित्रण करते की हा ब्रँड म्हणजे प्रश्नांचा, जिज्ञासेचा मानवी चेहरा बनून उभा आहे.”
अभियानातील योगदान
क्रिएटिव्ह टीम: अग्नेलो डायस, लता वासुदेवन बागची आणि हेतल अजमेरा – शार्पनर डिझाईन स्टुडिओ
प्रोडक्शन हाऊस : फ्युचर ईस्ट फिल्म्स
दिग्दर्शक : अशीम अहलुवालिया
एबीपी ग्रुप
१९२२ साली एक चारपानी सायंदैनिक म्हणून आनंदबाजार पत्रिका पहिल्यांदा प्रकाशित झाली. त्यावेळी किंमत होती फक्त दोन पैसे आणि दर दिवशीचा खप होता जवळपास १००० प्रती. आज शंभर वर्षांनंतर आनंदबाजार पत्रिका या दैनिकाला दर दिवशी एक कोटींहून अधिक वाचक लाभले आहेत. आज एबीपी समूहात आठ नामांकित प्रकाशनं, सहा टीव्ही न्यूज चॅनेल्स, आठ भाषांमधील डिजिटल न्यूज आणि ताज्या घडामोडींची माहिती देणारे प्लॅटफॉर्म्स, मोबाईल इंटरनेट व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स, एक रेडिओ स्टेशन, एक आघाडीची प्रकाशन संस्था, शैक्षणिक उद्योग, चित्रपट निर्मिती व ओटीटी प्लॅटफॉर्म यांचा समावेश असलेला दिग्गज मीडिया समूह बनला आहे. एक प्रादेशिक माध्यम समूह म्हणून सुरु करण्यात आलेल्या एबीपीनं अवघ्या देशभरात आपलं जाळं पसरलं असून, लाखो वाचकांच्या आणि प्रेक्षकांच्याही जीवनात आज आपुलकीचं स्थान मिळवलं आहे.