देशहित प्रथम मानून बाबासाहेबानी आजन्म कार्य केले तेव्हा ते युगनायक झाले !

.

भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि बाबासाहेबांची सामाजिक समानतेची चळवळ समांतर सुरू राहिली. देश स्वतंत्र होताना त्याची धुरा सांभाळणारा भारतीय नागरिक खंबीर असायला हवा हाच या सामाजिक चळवळी मागचा प्रमुख हेतू होता. देशहित प्रथम मानून बाबासाहेबानी आजन्म कार्य केले म्हणून ते युगनायक होऊन आजही लोकांच्या मनावर अधिराज्य करू शकले, असे प्रतिपादन शिक्षक, पत्रकार तथा साहित्यिक भावार्थ मांद्रेकर यांनी कोरगांव येथे केले.

सिद्धार्थ क्रीडा व सांस्कृतिक संघ , कोरगांवच्यावतीने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळ्याचे प्रमुख वक्ते या नात्याने मांद्रेकर व्यासपीठावरून बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून हरमल जिल्हा पंचायत समिती सदस्य रंगनाथ कलशावकर, विशेष अतिथी म्हणून कोरगावच्या पंच सदस्य तथा माजी सरपंच प्रमिला देसाई , डॉ आंबेडकर जनसेवा संघाचे पेडणे तालुका अध्यक्ष दिवाकर जाधव, युगनायक गोवाचे उपाध्यक्ष सुदन पेडणेकर, सिद्धार्थ कला क्रीडा संघाचे अध्यक्ष संजय कोरगावकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या ओघवत्या शैलीत भावार्थ मांद्रेकर यांनी बाबासाहेबांच्या जीवन चरित्राचा आढावा घेताना त्यांनी शिक्षण हा विकासाचा केंद्रबिंदू मानून स्वतःचा व वंचित, पीडित, दलित समाजासोबत इतर मागासवर्गीय समाज, स्त्रिया, नोकरदारवर्ग यांच्या हितासाठी कसा घटनात्मक लढा पुकारला त्याचे चित्रण उभे केले. आजच्या मुलांनी स्वतःचा विकास साधायचा असेल तर दर्जेदार शिक्षणासोबत , नीतिमूल्ये आत्मसात करून मार्गक्रमण केले तरच समाज आणि पर्यायाने देश टिकेल असे भावार्थ मांद्रेकर म्हणाले.

ते पुढे म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर संघर्षपूर्ण जीवन जगले. वर्ण व्यवस्थेच्या जाचक रुढीमुळे त्यांना पदोपदी अपमान सहन करावा लागला. पण ते या संकटाना न भिता त्यावर आत्मविश्वासाने आरूढ झाले. संकट आणि संघर्षात त्यांनी संधी शोधली. आत्मभान हरपलेल्या समाजाला गगन भरारी घेण्यास त्यांच्या पंखात त्यांनी बळ भरले. त्यामुळेच १३१वर्षे उलटली तरी या महामानवाची थोरवी आजही गायली जाते.

जि. पं. सदस्य रंगनाथ कलशावकर म्हणाले की, बाबासाहेबांचे विचार हे मोती आहेत. ते अमूल्य असून आजच्या पिढीने ते आत्मसात करणे आणि त्या महापुरुषांच्या पाऊलावर पाऊल ठेऊन पुढे चालणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.

युगनायक गोवा उपाध्यक्ष सुदेश पेडणेकर यांनी बाबासाहेब कोण होते व आम्ही त्यांच्याकडून काय शिकावे याविषयी मार्गदर्शन केले. दिवाकर जाधव व संजय कोरगावकर यांची यावेळी समयोचित भाषणे झाली.

सिद्धार्थ कला व क्रीडा संघातर्फे यावेळी इतिहास, शिक्षण , पत्रकारिता, समाजसेवा व साहित्य क्षेत्रात भरीव कार्य केल्याबद्दल भावार्थ मांद्रेकर यांचा जि पं सदस्य रंगनाथ कलशावकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव केला गेला.

सुरुवातीला शिलाचरण जाधव यांनी प्रास्ताविक केले, अक्षय जाधव यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तर किशन जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मैथली जाधव यांनी केले.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar