मणिपाल हॉस्पिटल्स, गोवा येथे ९५ वर्षीय रुग्णाच्या मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया..
खरे तर कर्करोगाशी लढाई जिंकून थोडी उसंत मिळाल्यावर सदर शस्त्रक्रियेचा प्रसंग ओढावला होता.आणि परत एकदा र्दूदम्य ईच्छाशक्तीच्या बळावर नव्वदीपार रुग्ण यशस्वी शस्त्रक्रियेनंतर चालत घरी गेले.
गोव्यामध्ये सर्वसाधारण आयुष्यमान तसेच जीवनाची गुणवत्ता राष्ट्रीय सरासरीत वरचढ आहे. म्हणजेच ७५ वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरीकांची संख्या जास्त आहे. पण वयापरत्वे रक्तदाबासारख्या व्याधींवर नियंत्रणासाठी रक्त पातळ ठेवण्याचे औषध घेणे अनिवार्य होते.
उतारवयातील अशा व्यक्तींचे कधीतरी वरवर किरकोळ वाटणारे अपघात होतात. वयापरत्वे मेंदूची झीज झालेली असते आणि कवटीमधे बरीच पोकळ जागा असते. डोक्याला हलकासा मार आणि रक्त पातऴ करणारी गोळी, ह्या दोन्हींचा संगम जेंव्हा घडतो तेंव्हा मेंदूच्या बारीक रक्तवाहिन्या फुटून थेंब-थेंब रक्तस्त्राव होत राहतो. हे रक्त सुकते आणि मेंदूवर रक्ताची खपली बसायला सुरूवात होते. या खपलीचा मेंदूवर दाब पडत जातो आणि त्यामुळे अनेक लक्षणे दिसून येतात. जसे की चालताना तोल जाणे, अचानक विसरभोळेपणात वाढ, स्वभावात बदल, हाता-पायातील त्राण जाणे आणि अशी व्यक्ती परावलंबी होणे.
मणिपाल हॉस्पिटल्स, गोवा येथे ९५ वर्षांचे श्रीयुत राजेश्वर (रुग्णाच्या संमतीने नाव बदलले आहे) जवळपास २ महिन्यांपूर्वी घरात तोल गेल्याचे निमीत्त होऊन पडले. तेंव्हा काहीही दुखापत आढळली नाही, पण हळूहळू त्यांच्या डाव्या हाता-पायाची शक्ती कमी झाली. यामुळे ते काठीचा आधार घेऊन चालू लागले पण नंतर त्यांना व्हीलचेअरचा आसरा घ्यावा लागला. घरच्यांना त्यांच्या वागणूकीत बदल व कमालीचा विसराळूपणा दिसून आला. सीटी स्कॅन मधे त्यांच्या मेंदूच्या उजव्या बाजूला एक मोठी रक्ताची खपली दिसली, ज्यामुळे वरच्या सगळ्या त्रासांची सुसंगती लागली.
या शस्त्रक्रियेविषयी माहिती देताना मणिपाल हॉस्पिटल, गोव्याचे कन्सल्टंट न्युरोसर्जरी डॉ. ओंकार नारायण चुरी यांनी सांगितले, “अशा पध्दतीने होणारा रक्तस्त्राव आणि रोगाचे निदान साधारणपणे सहज करता येते. पण मेंदूची कोणतीही शस्त्रक्रिया करताना अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. या आजाराला क्रॉनिक सबड्युरल हिमॅटोमा (मेंदूवर थिजत जाणारी रक्ताची खपली) असे म्हटले जाते. ह्यामुळे सहसा वयोवृध्द रुग्णांच्या हालचाली मंदावतात आणि परावलंबन वाढते. सदर रुग्णाचे वय पाहता शस्त्रक्रियेचा निर्णय घेणे आमच्यासाठी बरेच आव्हानात्मक होते. ह्या शस्त्रक्रियेचे सर्व श्रेय त्यांच्या लढवय्या बाण्याला जाते, कारण काही वर्षांपूर्वीच त्यांनी कर्करोगाचे उपचार जीद्दीने पूर्ण केले होते. ह्या शस्त्रक्रियेला ते न डगमगता सामोरे गेले आणि जगण्याची तीव्र ईर्षा दाखवली. वृध्द लोकांवरील मेंदूच्या शस्त्रक्रियांचा निकाल खूप सुरक्षित, परिणामकारक आणि रुग्णाला त्यांच्या पायावर उभे करणारा असू शकतो, हे आपल्याला सदर शस्त्रक्रियेत दिसून येते. साधारण बधिरीकरण
भूल देऊन म्हणजे रुग्ण जागा असताना ही शस्त्रक्रिया करता येते. पण ९५ वर्षांच्या रुग्णाच्या मेंदूवर केलेली ही शस्त्रक्रिया दुर्मिळ आहे. कारण गोयंकरांचे सरासरी वयोमानच ८०च्या आसपास आहे.
विज्ञान, औषधशास्त्र आणि विशेषत: शस्त्रक्रियांचे निकष सतत बदलत आहेत. सर्व गोष्टी आधुनिक होत आहेत. आपल्या परिवारासाठी कोणताही निर्णय घेताना सुयोग्य चाचण्या करून आणि उपचारांच्या फायद्यांचा व तोट्यांचा समसमान विचार करायलाच हवा.” ते पुढे म्हणाले.
श्रीयूत राजेश्वर यांना शस्त्रक्रियेनंतर ५ दिवसांनी घरी पाठवण्यात आले. आता ते स्वत: चांगले हिंडू-फिरू शकतात आणि सुखरूप आहेत.