मांद्रे गावात रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांचे हाल होत असल्याकडे ‘स्वराज’ संस्थेच्या पदाधिकार्यांनी पेडणे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांची भेट घेऊन त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली.
मांद्रे गावातील सर्व रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबून राहत असून गटारही तुंबलेले आहेत . रस्त्यावर दगड धोंडे पालापाचोळा वाहुन आलेला आहे त्यामुळे रस्ते वाहतुकीसाठी आणि पादचाऱ्यांसाठी असुरक्षित बनले आहेत . प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या चोपडे – केरी यादरम्यान मांद्रे पंचायत कार्यालय ते मधलामाज पर्यंत रस्ता पाण्याखालीच असतो . दांडोसवाडा पुल परिसरातील रस्त्यावर पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना वाट शोधत चाचपडत जावे लागते . दांडोसवाडा ते मराठवाडा या रस्त्यावरही तशीच स्थिती आहे .
तसेच आश्वे – मांद्रे , सांवतवाडा पुल आणि गावातील इतर अंतर्गत रस्त्यावरून पाण्याचे लोट जात असतात . गटारामध्ये साचलेला कचरा व्यवस्थित न काढल्यामुळे अनेक ठिकाणी ही परिस्थिती उद्भवली आहे .
‘स्वराज’ संस्थेचे निमंत्रक अॅड. प्रसाद शहापुरकर आणि कार्यकारिणी सदस्य जगन्नाथ पार्सेकर यांच्यासह शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकारी , मामलेदार , गट विकास अधिकारी आणि बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाचे सहाय्यक अभियंता यांना निवेदन सादर केले .
उप जिल्हाधिकारी रोहन कासकर यांनी या प्रकारणाची गंभीर दखल घेतली असून सर्व संबंधित यंत्रणांना घेऊन येत्या दोन दिवसात धोकादायक स्थळांची पाहाणी केली जाईल आणि योग्य ती उपाय योजना करू असे आश्वासन उपजिल्हाधिकारी कासकर यांनी ‘स्वराज’ च्या पदाधिकार्यांना दिले आहे