शिक्षकांनी वाचनकौशल्य वृद्धिंगत करावे
-भगीरथ शेट्ये यांचे प्रतिपादन
वाचन हा भाषा विकासाचा पाया असून त्याद्वारे विद्यार्थ्यांची आकलनशक्ती व लेखनक्षमता विकसित होते म्हणून शिक्षकांनी वाचनकौशल्य विकसित करण्यासाठी प्रयत्नरत राहिले पाहिजे असे प्रतिपादन गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्ये यांनी नुकतेच केले.
गोवा बोर्डाने पर्वरी येथील डी. आय. ई. टीच्या सरस्वती सभागृहात दहावीच्या स्तरावर मराठी विषय शिकविणा-या शिक्षकांसाठी कार्यशाळा आयोजित केली होती. सदर कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात ते मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गोवा बोर्डाच्या मराठी अभ्यास मंडळाचे संयोजक देवेंद्र साठे यांची उपस्थिती होती.
उद्घाटन सत्रानंतर अभ्यास मंडळाच्या सदस्या वेदश्री पित्रे व अ अनुराधा म्हाळशेकर यांनी उपस्थितांना दहावीच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापन विषयक मार्गदर्शन केले. ज्ञानेश सांगावकर यांनी अभ्यासक्रम विभागणी, गुणभार याविषयी माहिती दिली. संयोजक देवेंद्र साठे यांनी बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचे स्वरुप, मांडणी, पर्यायांची निवड यांचे सोदाहरण विवेचन केले. त्यानंतर शिक्षकांनी बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित प्रश्नपेढी तयार करण्याच्या सत्रात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वर्षा चोडणकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सोमनाथ पिळगांवकर यांनी आभारप्रदर्शन केले.