‘सांप्रतकाळी दैवी बालक पृथ्वीतलावर जन्म घेत आहेत आणि हेच मानवजातीला सुराज्याकडे घेऊन जातील’, असे प्रतिपादन सौ. श्वेता क्लार्क यांनी श्रीलंका येथे आयोजित ‘द फोर्थ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन चिल्ड्रन अँड यूथ 2022’ या आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत बोलतांना केले. या परिषदेचे आयोजन ‘दी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॉलेज मेनेजमेंट’ (TIIKM) यांनी केले होते. सौ. श्वेता क्लार्क यांनी ‘दैवी बालक कसे ओळखावे आणि त्यांचे संगोपन कसे करावे’ हा शोधनिबंध सादर केला. त्याबद्दल त्यांना ‘सर्वाेत्कृष्ट सादरकर्ता’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या शोधनिबंधाचे लेखक महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले असून, श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क हे सहलेखक आहेत. हे विश्वविद्यालया द्वारे वैज्ञानिक परिषदांमधील 94 वे सादरीकरण होते.
सौ. श्वेता क्लार्क पुढे म्हणाल्या की, सध्या साधकांच्या पोटी अनेक उच्च आध्यात्मिक पातळी असलेली बालके जन्म घेत आहेत; म्हणून आम्ही त्यांना ‘दैवी बालक’, असे संबोधतो. त्यांच्यामध्ये आज्ञाधारकपणा, उच्च विचारक्षमता आणि आध्यात्मिक क्षमता, अध्यात्माची ओढ आणि ईश्वराप्रती भाव दिसून येतो. जीवनातील प्रतिकूल प्रसंगांमध्ये ते स्थिर रहातात आणि त्यांचा जीवनाकडे पहाण्याचा दृष्टीकोन आध्यात्मिक असतो. त्यांच्यामध्ये सूक्ष्मातील सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने जाणण्याची क्षमता असते.
युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) वापरून केलेल्या एका चाचणीत सूक्ष्म परीक्षणातून ज्ञात झालेली 8 दैवी बालके आणि 32 सर्वसाधारण बालके यांच्यातील सूक्ष्म–ऊर्जेचे मापन करण्यात आले. सर्वसाधारण बालकांमध्ये अत्यल्प सकारात्मक ऊर्जा, तर पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असल्याचे जाणवले. याउलट दैवी बालकांमध्ये अत्यल्प नकारात्मक ऊर्जा, तर पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळली. यातील जन्मतः संतपदाच्या आध्यात्मिक पातळीला असलेल्या दोन 3 वर्षीय दैवी बालकांच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळी सर्वाेच्च, म्हणजे अनुक्रमे 821 आणि 793 मीटर होत्या.
अन्य एका चाचणीत 3 दैवी बालकांना 1 घंटा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप करायला सांगण्यात आला. त्यांच्यातील मुळात अल्प असलेली नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ नामजपानंतर 86 टक्क्यांनी न्यून झाली, तर सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ 87 टक्क्यांनी वाढली. दैवी बालकांना सकारात्मकता वाढवणारे आणि नकारात्मकता न्यून करणारे उपक्रम शिकवण्यात येतात, उदा. ‘राग, हट्टीपणा, आळस’, यांसारखे स्वभावदोष घालवण्यासाठी स्वभावदोष–निर्मूलन प्रक्रिया, संगीत–नृत्य आदी विविध कला, तसेच आश्रम स्वच्छता, ध्वनीचित्रफीत संकलन इ. तांत्रिक सेवा यांच्या माध्यमातून सत्सेवा करणे इ.
समारोप करताना सौ. क्लार्क म्हणाल्या की, ‘आपल्या पाल्यांवर योग्य संस्कार करणे, तसेच त्यांना आध्यात्मिकदृष्ट्या पोषक वातावरण उपलब्ध करून देणे, ते ज्यासाठी जन्माला आले आहेत ते ‘ईश्वरप्राप्ती’, हे पाल्यांचे मूलभूत ध्येय साध्य करण्यासाठी दिशा देणे, पालकांचे दायित्व आहे.