मुले सुधारावी असे वाटणाऱ्या पालकांनी प्रथम स्वतः सुधरावे
केरी दि १६
आज पालक म्हणून आपण मुलांना जेवढा वेळ देऊ तेवढाच वेळ ही मुलं भविष्यात आपल्या पालकांना देतील. कारण मुलं जी घडतात ती पालकांच्या अनुकरणातून घडतात. मुले ही आपला आरसा आहेत. त्यामुळे मुले सुधारावी असे वाटत असल्यास पालकांनी अगोदर सुधारावे. मुले आपोआपच सुधारतील, असे प्रतिपादन केरी न्यू इंग्लिश हायस्कुलचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी केरी येथे प्राथमिक शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या वार्षिक सभेत केले.
याप्रसंगी मांद्रेकर यांच्यासोबत पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सिमरन तळकर, तन्वी तळकर,अंकिता न्हाजी, पल्लवी शेट्ये व गोविंद कान्होजी उपस्थित होते.
मांद्रेकर पुढे म्हणाले की, अधिकार गाजवणारा पालक न होता लोकशाहीवादी पालक होऊन आपल्या पाल्याचे हित अहित जाणून घेणारा पालक हवा. आपले विचार, आशा आकांक्षा त्यांच्यावर न थोपवता त्यांचा मित्र होऊन त्यांच्या कालानीशी मुलांना समजणारा पालक होणे ही आजच्या घडीला आवश्यकता आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. पालक शिक्षक संघटनेच्या उपाध्याक्षा सिमरन तळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन सलोनी हर्जी यांनी केले. दीक्षा माणगावकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. शिक्षिका शमा गडेकर यांनी आर्थिक अहवाल वाचला. सोनाली वस्त यांनी शाळेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम करणार, त्याचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार शिक्षिका निकिता मठकर हिने मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.