पणजी,ता.२५(
तबला गुरू कै. पं. प्रभाकर च्यारी यांच्या पुण्यस्मरणार्थ म्हापसाबुजुर्ग येथील श्री. गणेश विद्या मंदिर विद्यालयाच्या सभागृहात रविवारी झालेल्या गुरुवंदना संगीत सभेत पं. च्यारी यांच्या शिष्यांनी रसिकांना तबलावादानाची पर्वणी दिली.
पं. प्रभाकर च्यारी शिष्यपरिवार आणि पं. प्रभाकर च्यारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला. संगीत सभेचा प्रारंभ गुरू माता अरुणाबाई च्यारी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आला. त्यानंतर सर्व शिष्यांनी गुरुवर्य पं.च्यारी
यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली.संगीत सभेचे प्रमुख संयोजक डॉ. राजेश भटकुर्से यांनी स्वागत केले. पं.च्यारी यांचे ज्येष्ठ शिष्य नितीन कोरगावकर यांच्या तबला सोलो वादनाने वादन मैफलीना सुरवात झाली. त्यांनी पेशकार, कायदे, चक्रदार,रेला, परण, तुकडे वाजवून छान वातावरण निर्मिती केली.
त्यानंतर गुरुजींचे ज्येष्ठ शिष्य संदीप भरणे यांनी तबला सोलोवादन करून रंग भरला. अमित भोसले व त्यांचे बाल शिष्य स्वस्तिक नाईक यांनी तबलासहवादनात अनेक बंदिशी वाजवून रंगत आणली. त्यानंतर प्रसाद गावस यांचे हार्मोनियम सोलोवादन रंगले त्यांना अमर मोपकर यांनी पुरक तबला साथ दिली. शेवटी गुरुजींचे शिष्य डॉ. राजेश भटकुर्से,डॉ. साईश देशपांडे, अमर मोपकर व गितेश मांद्रेकर यांनी तबला सहवादनात विविध प्रकारच्या बंदिशी
प्रभावीपणे वाजवून बहार आणली.
मालू गावकर व सृजन भटकुर्से यांनी नगमा साथ दिली.सौ. स्वाती नाईक यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला गुरुजींचे ज्येष्ठ शिष्य पं. उल्हास वेलिंगकर, नामवंत तबलावादक मयांक बेडेकर, प्रसिद्ध नृत्यांगना वरदा बेडेकर ,प्रसिद्ध सतारवादक योगेश हिरवे उपस्थित होते.
फोटो ओळी: म्हापसा येथे पं प्रभाकर च्यारी पुण्यस्मरण संगीत सभेत तबला सहवादन करतांना अमित भोसले व स्वस्तिक नाईक