*पितृपक्ष आणि श्राद्धविधी : महान ऋषिमुनींनी दिलेले अनमोल संस्कृतीधन ! – राजश्री गडेकर, हिंदु जनजागृती समिती*
म्हापसा, ९ सप्टेंबर – हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते. माता-पिता तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ यावर्षी १० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर या कालावधीत पितृपक्ष आहे. महान ऋषिमुनींनी दिलेले हे अनमोल संस्कृतीधन आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री गडेकर यांनी केले. हणजूण येथील श्री. सहदेव कांबळी यांच्या निवासस्थानी आयाजित एका प्रवचनामध्ये सौ. राजश्री गडेकर यांनी ही माहिती दिली.
सौ. राजश्री गडेकर पुढे म्हणाल्या, ‘‘प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचाही आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आढळतो. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म-शक्ती सामावलेली असते. श्राद्धाचे इतके महत्त्व असतांनाही आज हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव, त्यांचा अध्यात्मावरील अविश्वास आदींमुळे श्राद्धविधी दुर्लक्षिला वा अवास्तव अवाजवी कर्मकांडात गणला जाऊ लागला आहे. वास्तविक अन्य संस्कारांइतकाच ‘श्राद्ध’ हा संस्कारही अत्यावश्यक कसा आहे. तसेच दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा जास्तीत जास्त नामजप करावा. या काळात प्रतिदिन न्यूनतम १२ माळा नामजप करण्याचा प्रयत्न करावा’’.
*आपला विश्वासू,*
*डॉ. मनोज सोलंकी, गोवा राज्य, समन्वयक*
*हिंदु जनजागृती समितीकरिता, (संपर्क : 9326103278 )*