राष्ट्रीय शुटिंग स्पर्धेसाठी
अॅड. मेघश्याम भांगले ज्युरी
पणजी : २४ :
रायफल शुटिंग असोसिएशन, गोवाचे सरचिटणीस आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी प्रशिक्षक आणि ज्युरी ॲड. मेघश्याम उर्फ विक्रम भांगले यांची २७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर दरम्यान गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये अॅड. भांगले यांनी पंच, व्यवस्थापक, प्रशिक्षक अशा अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. कॉमनवेल्थ गेम, सॅफ गेम, एशियन ऑलिम्पिक, एशियन एअरगन या आंतरराष्ट्रीय स्पर्धांबरोबर रशिया, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कतार, मेक्सिको आदी देशांमध्ये पार पडलेल्या नेमबाजी स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, अधिकारी आदी जबाबदाऱ्याही त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. शिवाय इंटरनॅशनल शुटिंग स्पोर्ट्स फेडरेशन आयोजित वर्ल्डकप स्पर्धेचे ज्युरी म्हणूनही महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे. अॅड. भांगले यांनी सलग चारवेळा शुटिंग वर्ल्डकप स्पर्धांमध्ये योगदान दिले आहे.
आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर नेमबाजी खेळामध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे निभावणाऱ्या अॅड. भांगले यांच्यावर राष्ट्रीय स्पर्धेतील नेमबाजी ( शुटिंग ) ज्युरीपदाची महत्त्वाची सूत्रे असतील. स्वत: त्यांनी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये नेमबाजीत चमक दाखविली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक नेमबाज तयार झाले असून त्यातील काहीजणांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके प्राप्त केली आहेत. तसेच काही नेमबाजांची ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही निवड झाली आहे. राष्ट्रीय रायफल असोसिएशनचे ते सचिव आहेत. गेली ३४ वर्षे ते नेमबाजीच्या प्रसारासाठी कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यातील नेमबाजांनीही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धांमध्ये स्पृहणीय यश मिळवले आहे. जर्मनीस्थित आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाचे मान्यताप्राप्त प्रशिक्षक म्हणून त्यांचा लौकीक आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रायफल शुटिंग असोसिएशन, गोवाचे सचिव राजेश परब यांनी अभिनंदन केले आहे.