हिंदु जनजागृती समिती द्विदशक पूर्ती
*घटस्थापनेच्या दिवसापासून हिंदुराष्ट्र प्रतिज्ञेचा प्रारंभ*
म्हापसा, दि. २७ सप्टेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशक पूर्ती निमित्ताने नवरात्रोत्सव या उत्सवाचे औचित्य साधून घटस्थापनेच्या दिवसापासून म्हापश्यात हिंदुराष्ट्र प्रतिज्ञा घेण्यास प्रारंभ झाला आहे. श्री. राष्ट्रोळी मंदिर, सीम, खोर्ली व श्री शिवनागनाथ मंदिर, साईनगर, वेरला, कणका या मंदिरात या प्रतिज्ञा घेण्यात आल्या.
हिंदु धर्मीय बांधवांवर होणारे अनन्वित अत्याचार, विविध प्रकारचे जिहाद आणि धर्मांतर या समस्यांवर प्रतिज्ञेच्या वेळी जागृती करण्यात आली. तसेच या समस्यांवर त्वरित आळा घालण्यासाठी हे राष्ट्र हिंदुराष्ट्र म्हणून त्वरित घोषित व्हायला हवे, अशी निकड यावेळी व्यक्त करण्यात आली.
यावेळी सर्वश्री प्रशांत वाळके, महेश शिरगावकर, जयेश थळी, राजेश कोरगावकर, सौ. शुभा सावंत व इतर उपस्थित होते. नवरात्रीच्या दरम्यान म्हापसा येथील नवरात्रात मंडळ, श्री श्रीकृष्ण पूजन मंडळ व देवस्थाने मिळून पंचवीसहून अधिक ठिकाणी सदर प्रार्थना घेण्याचे ठरले आहे.