शैक्षणिक साधन प्रकल्प स्पर्धेत सौ. गीता कानोजी प्रथम.
हरमल
राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पर्वरीतर्फे गोवा विज्ञान केंद्र, मिरामार गोवा आणि नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या, राज्यस्तरीय पश्चिम विभाग भारत विज्ञान मेळाव्यात शिक्षकांसाठी असलेल्या शैक्षणिक साधन प्रकल्प स्पर्धेत हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या जीवशास्त्र विषयाच्या शिक्षिका सौ. गीता तुषार कानोजी यांनी संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
मिरामार – गोवा येथील गोवा विज्ञान केंद्रात ही स्पर्धा संपन्न झाली. ‘Z – स्कीम ऑफ लाईट रिएक्शन’ या विषयावर हा प्रकल्प सादर करण्यात आला होता. स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री. नागराज होन्नेकेरी यांनी सौ. गीता कानोजी यांना रोख दोन हजार रुपये व प्रमाणपत्र प्रदान केले.
आता नेहरू विज्ञान केंद्र, वरळी – मुंबई येथे 14 ते 16 डिसेंबर यादरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय विज्ञान मेळाव्यात हा प्रकल्प सादर होणार आहे. याठिकाणी गोव्यासह गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यातील तसेच दादरा व नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशातील ही बक्षीस पात्र प्रकल्प सहभागी होणार आहेत.
सौ. गीता कानोजी यांनी मिळवलेल्या या यशासाठी हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाचे चेअरमन आणि माजी मुख्यमंत्री श्री.लक्ष्मीकांत पार्सेकर, उच्च माध्यमिक विद्यालयाच्या व्यवस्थापिका सौ स्मिता पार्सेकर, प्राचार्य गोविंदराज देसाई, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष जयराम परब तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.