खोरजुवे-सिकेरी पुलासाठी हळदोणा, मये आमदारांकडून पाहणी
म्हापसा
हणदोणा व मये मतदारसंघाच्या आमदारांनी संयुक्तपणे मयेचे पंच सदस्य तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इंजिनियर्सना सोबत घेऊन खोरजुवे-सिकेरी प्रस्तावित पूलाच्या जागेची पाहणी केली. या पुलामुळे ही दोन गावे जोडली जाणार आहेत. सध्या लोखंडी पुलाच्या मदतीने या दोन गावातील लोक ये-जा करत आहेत. विशेषकरून मये मतदारसंघातील सिकेरी गावातील लोकांना खोरजुवे व हणदोणा येथे जाण्यासाठी या लोखंडी पुलाचा आधार आहे.
‘पुलाचा प्रस्ताव चांगला आहे. यासाठी दोन पर्याय आहेत. इंजिनियर्सनी पाहणी करून अंतिम निर्णय कळवल्यानंतर आमच्याबाजूने आम्ही त्यांना सर्व आवश्यक सहकार्य करू. खोरजुवेतील लोकांना देखील हा पूल झालेला हवा आहे. त्यामुळे आमच्या मतदारसंघातील लोक पुढे सरसावून याला पाठिंबा देतील, असे हळदोणेचे आमदार कार्लुस आल्वारेस फरेरा यांनी सांगितले.
यापूर्वी जेव्हा मी या जागेला भेट दिली त्यावेळी मी शाळेतील मुले या पुलावरून जाताना पाहिली. कामावर जाण्यासाठी लोकदेखील या लोखंडी पुलाचा वापर करताना मला दिसले. सिकेरीतील लोकांसाठी हा लोखंडी पूल उपयोगी आहे. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीने तो अधिक काळ वापरणे योग्य नाही. मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनीदेखील या पुलाचा आग्रह धरताना या प्रस्तावाचा राज्य सरकार नक्कीच विचार करेल, असे सांगितले.
‘आम्ही सध्याच्या या लोखंडी पूलाचे रुपांतर आरसीसी कॉंक्रिट पूलामध्ये करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे आम्ही संयुक्त पाहणी केली. यापूर्वी आमच्या पूर्वजांनी लाकडी पूल बांधला होता. काळानुसार यात बदल करून तो लोखंडी करण्यात आला, असे शेट म्हणाले.
‘या पूलाची नितांत गरज आहे. हळदोण्याच्या आमदारांशी मी या पूलाबद्दल गांभिर्याने बोललो आहे. आम्ही व्यवस्थित प्रस्ताव सादर केल्यास सरकार नक्कीच प्रतिसाद देईल, असे शेट पुढे म्हणाले. सध्याच्या नियोजित जागेवर बांधण्याचा विचार असून दुसरा विचार हा काही अंतर सोडून पुढे बांधण्याचा देखील आहे. दोन्ही पूलांसाठी लागणार्या खर्चाचा ताळेबंद पाहून कमी खर्चात होणारा विचार सरकार ध्यानात घेण्याची शक्यता आहे.