आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलने श्रीमती अनन्या बिर्ला व श्री. आर्यमान विक्रम बिर्ला यांना संचालक म्हणून नियुक्त केले.
३१/०१/२३, मुंबई: आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या संचालक मंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीमध्ये श्रीमती अनन्या बिर्ला व श्री. आर्यमान विक्रम बिर्ला यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योजकता व व्यवसाय उभारणीचा समृद्ध व वैविध्यपूर्ण अनुभव श्रीमती अनन्या बिर्ला व श्री. आर्यमान विक्रम बिर्ला यांच्याकडे आहे. संचालक मंडळाला विश्वास वाटतो की, त्यांचे आधुनिक विचार, दृष्टिकोन आणि व्यवसायिक कौशल्यांचा फायदा आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलला मिळेल.
आदित्य बिर्ला उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. कुमार मंगलम बिर्ला यांनी सांगितले, “आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलने अनेक विविध कॅटेगरीज व फॉरमॅट्समध्ये फॅशन ब्रँड्सचा एक मजबूत पोर्टफोलिओ उभारला आहे, ज्यामध्ये भारतातील कपडे बाजारपेठेतील जवळपास सर्व प्रमुख सेगमेंट्सचा समावेश आहे. गेल्या काही वर्षात, कंपनीने एथनिक वेअरसारख्या नव्याने उदयास येत असलेल्या विविध सेगमेंट्समध्ये देखील प्रवेश केला आहे, आपले डिजिटल व्हेंचर टीएमआरडब्ल्यूमार्फत भारतीय डिझायनर्स, लक्झरी, स्पोर्ट्सवेअर आणि आधुनिक काळातील उद्योगांसोबत भागीदारीचा देखील यामध्ये समावेश आहे. आता आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल प्लॅटफॉर्म लक्षणीय वृद्धीच्या नव्या लाटेवर स्वार होण्यासाठी सज्ज आहे. अनन्या आणि आर्यमान यांनी स्वतः निवडलेल्या क्षेत्रात मिळवलेले उत्तम वैयक्तिक यश आणि त्यांच्या स्वतंत्र उद्योगांमध्ये खूपच कमी कालावधीमध्ये मिळालेले यश यामुळे आता ते मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी तयार आहेत. आधुनिक काळातील बिझनेस मॉडेल्स व ग्राहकांच्या सवयी, आचरणातील नवे बदल याविषयी त्यांना असलेली गहिरी समज यामुळे आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेलच्या संचालक मंडळात नव्या ऊर्जेचा संचार होईल.” त्यांनी पुढे सांगितले, “उद्योगसमूहाची मूल्ये अनन्या व आर्यमान यांच्यात खोलवर रुजलेली आहेत आणि उद्योगसमूहाच्या उद्दिष्टांवर त्यांचा ठाम विश्वास आहे. मला पक्की खात्री आहे की ते या उद्योगसमूहाच्या समृद्ध उद्योजकता परंपरांचा वारसा पुढे चालवतील आणि हितधारकांसाठी शाश्वत मूल्य निर्माण करण्याचा यशस्वी ट्रॅक रेकॉर्ड समर्थपणे पुढे नेतील.”
श्रीमती अनन्या बिर्ला व श्री. आर्यमान विक्रम बिर्ला यांची नुकतीच आदित्य बिर्ला मॅनेजमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळामध्ये नियुक्ती करण्यात आली. आदित्य बिर्ला ग्रुपमधील व्यवसायांना धोरणात्मक दिशा दाखवण्याचे काम करणारी ही सर्वोच्च कंपनी आहे.
यशस्वी महिला उद्योजिका श्रीमती अनन्या बिर्ला या प्लॅटिनम सेलिंग आर्टिस्ट आहेत. त्यांनी त्यांची पहिली कंपनी स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड वयाच्या १७ व्या वर्षी सुरु केली. आज तिचा समावेश भारतातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होत असलेल्या एमएफआयमध्ये होतो. १ बिलियन युएसडीचे एयुएम या कंपनीने पार केले असून १२०% सीएजीआरने (२०१५-२०२२) वाढ केली आहे. ७००० पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या या कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क हा खिताब देखील देण्यात आला आहे. क्रिसिल ए+ रेटिंग मिळालेली स्वतंत्र ही या क्षेत्रातील सर्वात नवी आणि सर्वाधिक रेटिंग मिळालेली कंपनी आहे. २०१८ साली स्वतंत्रने मायक्रो हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडला यशस्वीपणे अधिग्रहित केले. संपूर्ण व्यवसायात श्रीमती अनन्या यांनी आणलेल्या नाविन्यामुळे उद्योगक्षेत्रात पहिल्यांदाच सादर केल्या जात असलेल्या अनेक गोष्टी या कंपनीने आणल्या. यामुळे आर्थिक सेवा क्षेत्रातील दिग्गज हे स्वतंत्रचे स्थान अधिक मजबूत झाले. श्रीमती बिर्ला या डिझाईनला सर्वाधिक महत्त्व देणारा होम डेकोर ब्रँड इकाई असाईच्या संस्थापिका आहेत. सामाजिक क्षेत्रात श्रीमती अनन्या बिर्ला या एम्पॉवरच्या सह-संस्थापिका आहेत. भारतात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे याचा त्यांनी पुरस्कार केला आहे. त्यांनी अनन्या बिर्ला फाऊंडेशन देखील सुरु केले आहे, ज्यामध्ये मानसिक आरोग्य व सामाजिक प्रभाव या क्षेत्रात संशोधन केले जाते.
श्री. आर्यमान विक्रम बिर्ला यांच्याकडे असलेल्या वैविध्यपूर्ण अनुभवांमध्ये उद्योजकता, व्हीसी गुंतवणूक व व्यावसायिक खेळ यांचा समावेश आहे. आदित्य बिर्ला उद्योग समूहातील अनेक व्यवसायांमध्ये त्यांचा खूप जवळून सहभाग असतो. उद्योगसमूहाचे अध्यक्ष श्री. कुमार मंगलम बिर्ला यांच्या सल्ल्याने ते आधुनिक व्यवसायांमध्ये या समूहाच्या पदार्पणाला प्रोत्साहन देत आहेत. उद्योग समूहाचा डी२सी प्लॅटफॉर्म टीएमआरडब्ल्यूला इन्क्युबेट करण्यात श्री. आर्यमान यांनी मदत केली असून ते त्याच्या मंडळातील संचालक आहेत. उद्योग विश्वात त्यांनी पहिले पाऊल हॉस्पिटॅलिटी व्यवसायात ठेवले. आदित्य बिर्ला व्हेंचर्स या उद्योग समूहाच्या व्हेंचर कॅपिटल फंडचे नेतृत्व देखील श्री. आर्यमान करत आहेत. आदित्य बिर्ला उद्योग समूहात येण्याआधी श्री. आर्यमान हे एक उत्तम प्रथम श्रेणी क्रिकेटर होते.