लेखनासाठी प्रगल्भ वाचन करावे सौ. श्रेया केळकर
थिवी: थिवी येथील उदेंतें दर्पण संस्थेतर्फे साहित्यिक हळदी कुंकू दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला प्रमुख वक्त्या म्हणून सौ श्रेया केळकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून सौ नूतन साखरदांडे व सौ. सुचेता पै होत्या.
प्रगल्भ लेखन करण्यासाठी भरपूर वाचन करावे. कोंकणी, मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच अन्य भाषातील दर्जेदार साहित्य वाचन करुन ,आपल्या लेखन- कौशल्यातून लेखन करावे म्हणजे हळूहळू दर्जेदार साहित्य निर्माण होईल असे विचार केळकर यांनी यावेळी मांडले.
प्रमुख पाहुण्या सौ.नुतन साखरदांडे यांनी कुठचीही गोष्ट गोठवल्यानंतरच परिपक्व होते. साहित्य पण त्याच्यापासून दूर राहू शकत नाही असे विचार मांडले. दुसऱ्या प्रमुख पाहुण्या सौ. सुचेता पै यानी सगळ्यांनी वाचन-लेखन करावे तसेच आपले साहित्य प्रकाशित करावे, जेणेकरून वाचक वर्ग त्याचा लाभ घेतील असे प्रतिपादन केले. तसेच त्यांनी संस्थेच्या विविध उपक्रमाबद्दल संस्थेचे कौतुक केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वललाने व प्रार्थनेने केली. कु. श्रिया कामत हिने उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली. सौ अभया कामत हिने उपस्थितांचे स्वागत नाचणे- तृणधान्य देऊन केले. श्री. वामन धारवाडकर यांनी सगळ्यांचे आभार व्यक्त केले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. हरीश कामत यांनी केले. गावातील ग्रामस्थांनी या सोहळ्याला उपस्थित लावली.