वेदमंत्र पठन केल्याने विद्यार्थ्यांना आत्मिक बळ व एकाग्रता प्राप्त होते – प्रसाद देशमुख*
म्हापसा
ताहार


विद्यार्थ्यांकरिता वेद व ध्यान साधना म्हापसामार्फत सात दिवसीय मोफत वैदिक समर कॅम्प दिनांक 18 एप्रिल ते 24 एप्रिल दरम्यान मुरुड म्हापसा येथे आयोजित करण्यात आले आहे.
शिबिराच्या संयोजिका रूपाली गौडाळकर यांनी प्रास्ताविकामध्ये, लहान मुलांकरिता वेदमंत्र पठण व त्याचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे ज्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते बुद्धिमत्ता वाढते एकाग्रता शक्ती वाढते व मुलांना त्यांची आयुष्यामध्ये यश प्राप्त होण्याकरिता मदत मिळते असे सांगितले.
या शिबिरामध्ये वेदगुरू श्री प्रसाद देशमुख यांनी ओमकार पठणाचे महत्त्व तसेच वेदमंत्रांची निर्मिती व वेदमंत्रपठनाचा आयुष्यामध्ये उपयोग विद्यार्थ्यांना कशाप्रकारे होतो यासाठी मार्गदर्शन केले.
वेद हे आपल्या भारतीय संस्कृतीचा आधार आहेत व वेदांमधून जीवन जगण्यासाठी शक्ती व ऊर्जा प्राप्त होते तसेच भगवंताचे कृपा आशीर्वाद प्राप्त होतात.
ओमकार पठण केल्यामुळे आपल्या शरीरावर सकारात्मक परिणाम होऊन, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकास व एकाग्रतेकरिता या स्पंदनांचा उपयोग होतो तसेच सुदृढ शरीर बनण्याकरिता ओमकार पठण करण्याचे खूप महत्त्व आहे अशी माहिती श्री देशमुख यांनी दिली.
वेदमंत्रांची निर्मिती कशी झाली तसेच ते 21 व्या शतकापर्यंत कसे पोहोचलेत व या नवीन आधुनिक जीवनामध्ये वेदमंत्रा पठणाच्या माध्यमातून आत्मिक शांती एकाग्रता आत्मिक बळ कसे प्राप्त होते त्याचबरोबर वेदमंत्र पठण करण्याची शास्त्रशुद्ध पद्धती या शिबिरामध्ये शिकवण्यात आली. म्हापसा परिसरातील 150 विद्यार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत.