क्रीडा क्षेत्राच्या उत्थानासाठी सर्वतोपरी सहाय्य ः राजेश फळदेसाई
पणजी ः
युवांनी क्रीडा प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवून नवीन उंची गाठावी. क्रीडापटूंना यासाठी प्रोत्साहन दिले जाईल, असे कुंभारजुवाचे आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले.
क्षत्रिय मराठा प्रीमियर लीग (केएमपीएल 2.0) टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेच्या रविवारी झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाज (एजीकेएसएम) यांनी फातोर्डा येथील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते.
यावेळी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा क्रिकेट असोसिएशनचे सचिव रोहन गावस देसाई, एजीकेएसएमचे अध्यक्ष महेश कृष्णा नाईक गावकर आदी मान्यवनर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्पर्धेचे विजेतेपद मराठा वॉरियर्स पेडणे यांनी पटकावले. मि. 36 डिचोली संघ उपविजेता राहिला. रॉयल मराठा केपेने तिसर्या स्थानासाठीचा चषक प्राप्त केला.
कुंभारजुवेच्या आमदारांनी 1,00,096 रुपयांचे पहिले बक्षीस व मालिकावीरासाठीचे सुवर्ण नाणे पुरस्कृत केेले होते. पुढील वर्षी प्रत्येक सामनावीरासाठी 1 ग्रामचे नाणे पुरस्कृत करणार असल्याचे आश्वासन फळदेसाई यांनी दिले.
आयोजकांचे कौतुक करताना फळदेसाई यांनी त्यांना फुटबॉल स्पर्धा देखील आयोजित करण्याची सूचना केली. या स्पर्धेसाठीदेखील आपला पाठिंबा असेल, असे ते म्हणाले.
‘तंदुरुस्ती व देशात सुरू असलेल्या व 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने सुरुवात झालेल्या फिट इंडिया मोहीमेवर भर देण्याचे आवाहन सहभागींना केले. या मोहिमेमुळे नागरिकांना तंदुरुस्त राहण्याची तसेच शारीरिक उपक्रम करण्याची तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागाची प्रेरणा मिळते,’ असे फळदेसाई म्हणाले.
खेळाडूंनी क्रीडा प्रकारांत यश मिळून शिखर गाठण्याचे ध्येय बाळगले पाहिजे. आम्हाला आमचे खेळाडू हे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले पहायला नक्कीच आवडेल. खेळाडूंनी मेहनत घेतल्याच इंडियन प्रीमियर लीगचे दार देखील त्यांना उघडे होऊ शकते. आम्ही खेळाडूंना प्रेरणा देऊन त्यांच्या प्रगतीत योगदान दिले पाहिजे. क्रीडा क्षेत्रासाठी सध्या अद्ययावत साधनसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आम्ही तुम्हाला सहाय्य करू, आम्ही शिक्षण क्षेत्रातही तुमचे अडथळे दूर करू, असे ते म्हणाले. स्पर्धेचे भव्य बक्षीस पुरस्कृत करून खेळाडूंना प्रेरणा दिल्याबद्दल मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कुंभारजुव्याच्या आमदारांचे कौतुक केले. आमच्या युवांमध्ये टॅलेंटची कमी नाही. त्यांच्या क्षमता, कौशल्य, उर्जा ठासून भरली आहे. हार न मानण्याची वृत्ती अंगी बाणवल्यास यश आपोआप मिळत जाते, असे मंत्री फळदेसाई यांनी सांगितले. उत्कृष्ट आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक करताना खेळाडूंची मेहनतीसाठी प्रशंसादेखील केली.