पोंबुर्फा झरीच्या नूतनीकरणाचे काम लवकरच
हळदोणा
पोंबुर्फा झर्याची शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी स्वयं-निर्मित नमुन्याच्या गरजेवर भर देऊन झर्यात सुधारणा व नूतनीकरण करून त्याचे लोकप्रिय पर्यटनस्थळात रुपांतर करण्याचे आश्वासन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी हळदोण्याचे आमदार कार्लुस आल्वारेस फरेरा यांना दिले.
खंवटे यांनी फरेरा तसेच पंचायत सदस्य व पर्यटन खात्यातील अधिकार्यांसह सोमवारी या झरीला भेट दिली. या दुर्लक्षित झरीचा विकास करण्याची स्थानिकांची दीर्घकाळापासूनची मागणी आहे, असे आमदारांनी सांगितले.
‘या झरीचे पाण्यामध्ये औषधी तत्वे आहेत त्यामुळे ही झरी लोकप्रिय आहे. समाजघातक प्रवृत्तींकडून या जागी अनैतिक कृत्ये केली जात आहेत. याची सातत्याने तक्रार स्थानिकांनी केली आहे. ही झरी जीर्णावस्थेत आहे. आम्ही या झरीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव मंत्र्यांना सादर करणार असून मंत्र्यांनी या कामी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे फरेरा म्हणाले.
आम्ही या भागाची पाहणी केली आहे. नूतनीकरणासाठी कायद्यानुसार उपलब्ध असलेल्या जागेचा वापर केला जाणार आहे. मंत्र्यांनी नेहमीच सकारात्मक धोरण ठेवले आहे. ते या झरीसाठी नक्कीच काहीतरी चांगले पाऊल उचलतील. त्यांच्यात मिडास ट्च आहे, असे फरेरा म्हणाले.
यावेळी बोलताना मंत्री खंवटे यांनी ही झर पिकनिकसाठी लोकप्रिय असल्याचे सांगितले. या झरीचा वापर करणार्यांनी आपली जबाबदारी ओळखून जबाबदारीने वागावे, असे आवाहन त्यांनी केले. पोंबुर्फातील झर बार्देश तालुक्यात लोकप्रिय आहे. परंतु, तिची स्थिती बिकट आहे. ती सुधारण्याची आवश्यकता आहे. 12 वर्षांपूर्वी जीटीडीसीने या झरीचे नूतनीकरण केले होते. परंतु, सध्याची स्थिती पाहता नूतनीकरण गरजे आहे, असे वाटते. या झरीची शाश्वतता निश्चित करण्यासाठी स्वयं-निर्मिती नमुन्याद्वारे आर्थिकदृष्ट्या विचार करण्याची गरज आहे. स्थानिक पंचायतीकडूनही यासाठी योजना आदी मिळणे गरजेचे आहे. मी स्थानिक आमदारांना सांगितले असून ते पंचायतीला सांगून प्रस्ताव सादर करतील. या ठिकाणी आवश्यक असलेली शौचालय, आवश्यक पायाभूत सुविधा, कपडे बदलण्याची खोली, मुलांसाठी उद्यान, पार्किंगची सोय आदींचा अभ्यास करून कामाची निविदा 2 महिन्यांत काढली जाईल, असे खंवटे म्हणाले. स्थानिक आमदार व इतर भागीदारांना विश्वासात घेऊनच काम केले जाईल. असे ते म्हणाले.