दिनांक : ५/९/२०२३
_*‘रणरागिणी’ची फोंडा येथील आल्मेदा विद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे मागणी*_
*रक्षाबंधनाच्या दिवशी विद्यार्थ्यांना हातातील राखी काढण्यास भाग पाडणार्यांवर कारवाई करा !*
फोंडा, ५ सप्टेंबर – फोंडा येथील आल्मेदा विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेच्या नावाने संदेश पाठवण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेत येतांना हातात राखी न बांधण्यास सांगण्यात आले. तसेच रक्षाबंधनाच्या दिवशी हातात राखी बांधून आलेल्यांना त्या काढण्यास भाग पाडण्यात आले. याविषयी विद्यालयातील काही पालकांकडून आलेल्या तक्रारीनंतर हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने ५ सप्टेंबर या दिवशी आल्मेदा विद्यालयाच्या व्यवस्थापनाशी भेट घेऊन त्यांच्याकडे या घटनेविषयी तक्रार नोंदवण्यात आली. यामध्ये दोषींवर कारवाई करून बिनशर्त माफी मागावी, असे आवाहन करण्यात आले. ‘रणरागिणी’ने याअनुषंगाने एक निवेदनही विद्यालयाच्या व्यवस्थापनाला दिले आहे. या वेळी रणरागिणीच्या शिष्टमंडळामध्ये सनातन संस्थेच्या सौ शुभा सावंत, सौ. हर्षा गुरव, रणरागिणीच्या सौ. राजश्री गडेकर, सौ. रेश्मा तळावलीकर, सौ. रेखा कोलवेकर आदींचा समावेश होता.
या निवेदनात म्हटले आहे की, रक्षाबंधन हा हिंदूंचा सण असून तो सर्वत्र उत्साहाने साजरा केला जातो. या वेळी भाऊ बहिणेच्या रक्षणासाठी वचनबद्ध होत असतो. सद्यस्थितीत महिलांवरील अत्याचारांमध्ये बलात्कार, विनयभंग आदी प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असतांना रक्षाबंधन महोत्सवाचे महत्त्व ठळकपणे दिसून येत आहे. रक्षाबंधनामुळे समाजात सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण होत असते. रक्षाबंधन साजरा करणे हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी राखी काढण्यास सांगणे हा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्यासारखे आहे, तसेच धार्मिक भावना दुखावण्याचा प्रकार आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने ३० ऑगस्ट २०२३ या दिवशी एक परिपत्रक काढून राखी काढण्यास भाग पाडणे हा ‘आर्.टी.ई. कायदा – २००९’ चे कलम १७ अंतर्गत गुन्हा असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती बाल हक्क संरक्षण आयोगालाही पाठवण्यात आल्या आहेत.
आपल्या विश्वासू,
*सौ. राजश्री गडेकर,*
रणरागिणी
(संपर्क क्रमांक – ७७७४८ ५१२५३)