गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोव्यामध्ये सुरू असलेल्या 54 व्या ‘इफ्फी’मध्ये ‘सीबीसी’ म्हणजेच केंद्रीय जनसंपर्क कार्यालयाच्या प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या वर्षीच्या ‘सीबीसी’ प्रदर्शनात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि भविष्यकालीन संभाव्य कल यांचा विचार करून भारतीय चित्रपट आणि त्यांच्या योगदानाचे प्रदर्शन करण्यात आले आहे. कला अकादमी, पणजी येथे केंद्रीय दळणवळण विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालय (आय अँड बी) द्वारे डिजिटल माध्यमाव्दारे हे प्रदर्शन करण्यात आले आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन त्याचे कौतुक केले. अशा प्रदर्शनांचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले की, प्रदर्शनातील प्रत्येक गोष्टीला इतिहास आहे. व्हीएफएक्स सारखे नवीन तंत्रज्ञान वापरल्यामुळे निर्माण झालेले आभासी वास्तव पाहण्यासारखे आहे. यामुळे, प्रदर्शन पाहणारी प्रत्येक व्यक्ती सिनेमाच्या जगामध्ये तल्लीन होवून जाते आणि प्रदर्शन अनोखा अनुभव प्रदान करते. ते पुढे म्हणाले, “सिनेमाप्रेमींच्या दृष्टीने इथे भेट देवून नवा आगळा अनुभव घेण्यासाठी आणि नवीन काही शिकण्यासाठी हे प्रदर्शन म्हणजे योग्य ठिकाण आहे.’’
‘भारतीय सिनेमा’ या मुख्य संकल्पनेवर हे प्रदर्शन आधारित आहे. त्यामध्ये सिनेमाच्या विविध पैलूंचे चित्रण करण्यात आले आहे. यामध्ये महिला सक्षमीकरण, सामाजिक कारणे आणि वर्तनातील परिवर्तन, महात्मा गांधी यांची विचारधारा, युवकांसाठी प्रेरणादायी विचार, राष्ट्रीय सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक सौहार्द, आणि प्रादेशिक भाषा आणि संस्कृती, अशा विविध विषयांवर आधारित सिनेमातील दृश्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.
प्रदर्शन परस्परसंवादी असल्यामुळे चित्रपट रसिकांना सिनेमाबद्दल जाणून घेण्याची परवानगीही आहे. त्यामुळे प्रदर्शन अधिक आकर्षक बनले आहे. ऑगमेंटेड रिअॅलिटी, व्हर्च्युअल रिअॅलिटी, डिजिटल पझल, इमर्सिव्ह रूम, डिजिटल फ्लिपबुक इत्यादी विविध तंत्रज्ञानामुळे प्रदर्शन पाहणा-यांच्या ज्ञानामध्ये आणि अनुभवामध्ये भर पडते.