हणजूण कायसुव पंचायतीने केलेल्या एका मोहिमे अंतर्गत पंचायत क्षेत्रात ठिकठिकाणी लावण्यात आलेले बेकायदेशीर जाहिरात फलक हटवले त्यामुळे परिसर काही प्रमाणात स्वच्छ दिसत आहे.
या पंचायत क्षेत्रातील तसेच बाजूच्या पंचायत क्षेत्रातील काही व्यवसायिकांनी ( हॉटेल, शॅक्स, रेस्टॉरंट्स, दुकानदार, मसाज पार्लर तसेच संगीत पार्ट्या करणाऱ्या आयोजकांनी ) नाक्यावर,रस्त्याच्या बाजूला खांब उभारून, तसेच वीज खांबावर व झाडांवरती छोटे मोठे जाहिरात फलक लावले होते, या जाहिरात फलकामुळे परिसराला ओंगळवाणे स्वरूप तर आले होतेच शिवाय वाहतूक चालकांनाही त्याचा अडथळा होत होता. वाहतुकीस अडथळा ठरणारे हे जाहिरात फलक हटवावे अशी तक्रार वजा मागणी येथील ग्रामस्थ रमेश नाईक यांनी 2 मार्च 2020 रोजी पंचायतीकडे केली होती.
तक्रार देऊनही पंचायतीने कोणती हालचाल न केल्यामुळे नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत त्याचे पडसाद उमटले होते. या ग्रामसभेत सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर यांनी सदर बेकायदेशीर जाहिरात फलक लवकरच आठवण्यात येतील असे आश्वासन दिले होते त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.