पालक व शिक्षकांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श या विषयाची ओळख करून दिल्यास, बाललैंगिक शोषणाविरुद्धच्या जनजागृतीबाबत लक्षणीय परिणाम साधला गेलेला दिसून येतो.

.

पालक व शिक्षकांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श या विषयाची ओळख करून दिल्यास, बाललैंगिक शोषणाविरुद्धच्या जनजागृतीबाबत लक्षणीय परिणाम साधला गेलेला दिसून येतो.

पणजी, १९ डिसेंबर, २०२३: गोव्यामध्ये मुलांविरोधातील अपराधांचे, खासकरून बाल लैंगिक शोषणाचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढले आहे. अशा निंदनीय घटना टाळण्यासाठी शिक्षक व पालकांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शांबाबत जागरूक करणे गरजेचे आहे. ‘अर्पण’ ही स्वयंसेवी संस्था, मुलांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्श शिकवून त्यांच्याभोवती सुरक्षेचे जाळे निर्माण करण्याकरता शिक्षकांना सखोल प्रशिक्षण पुरवत आहे. या संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, मुलांच्या असुरक्षित स्पर्शांविषयीच्या ज्ञानात भर पडून, पीडित मुलांनी मदत मागण्याच्या घटना वाढताना दिसत आहेत. बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी सर्वप्रथम अशा घटनांना पायबंद घालण्याचे प्रयत्न गरजेचे आहेत. प्रतिबंधात्मक प्रयत्नांची सुरुवात ही कोणत्याही धोक्यापासून/संकटापासून मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी समाजातील व्यक्ती आणि व्यावसायिकांची क्षमता किती आहे यावर अवलंबून असते. मुलांना वैयक्तिक सुरक्षा शिकवण्यासाठी, विविध जिल्ह्यांतील पालकांना व शिक्षकांना प्रेरित करणे हा या स्वयंसेवी संस्थेचा मुख्य उद्देश आहे. बाल लैंगिक शोषणाशी संबंधित धोके कमी करून, मुलांना सुरक्षित करणाऱ्या घटकांना मजबूत करण्याच्या हेतूने हे सक्रिय धोरण आखण्यात आले आहे.
याआधीही भारताताच्या विविध शहरांसह आणि गोव्यातील कित्येक मुलांनी तसेच प्रौढ व्यक्तींनी ‘अर्पण’च्या उपक्रमांचा लाभ घेतला आहे. लहान मुलांना सविस्तर माहिती आणि कौशल्ये पुरवत त्यांच्यात शोषणाविषयी बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण केल्यास, त्याचा लक्षणीय परिणाम दिसून येऊ शकतो. हा कार्यक्रम मुलांबरोबरच त्यांचे शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, मानसोपचार तज्ज्ञ आणि शासकीय अधिकारी यांनादेखील बाल लैंगिक शोषणाला प्रतिक्रिया देण्यासाठी लागणारी संसाधने पुरवतो. यावरून या कार्यक्रमाचा सर्वसमावेशक दृष्टिकोन अधोरेखित होतो.
‘अर्पण’च्या या प्रयत्नांचा पुरस्कार करताना गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष पीटर बोर्जेस म्हणतात – “अलिकडच्या काळात राज्यात मुलांविरोधातील अपराधांचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः बाल लैंगिक शोषणाच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येक मुलाला सुरक्षित राहण्याचा अधिकार असून, मुलांना सुरक्षित ठेवणे आणि असुरक्षित परिस्थिती आणि व्यक्तींपासून त्यांचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कित्येक मुलं लैंगिक शोषणामुळे होणारा मानसिक आघात निमुटपणे सहन करतात. केवळ प्रतिकात्मक कृतींपेक्षा, सामाजिक संस्थांनी एक पाऊल पुढे जात, बाल सुरक्षा धोरण आणि कार्यपद्धती प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत. अशा रीतीने आपल्या मुलांची संरक्षण व काळजी हा त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याचा सार्थ मार्ग म्हणता येईल.”
‘अर्पण’ मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित करते.
वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रम मुलांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्श ओळखण्यासाठी तसेच गरज वाटेल तेव्हा मदत मागण्यासाठी सक्षम करतो. हा कार्यक्रम ४ ते १५ या वयोगटातील मुलांकरता विविध शाळा व संस्थांमध्ये राबवला जातो. हा एक सर्वसमावेशक कार्यक्रम असून, बाल लैंगिक शोषणाचे धोके कमी करत, मुलांना सुरक्षित करणाऱ्या घटकांना मजबूत करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
आम्ही शिक्षक व पालकांना औपचारिक प्रशिक्षण पुरवतो. त्यानंतर ते मुलांना सुरक्षित कसे राहायचे या विषयावर प्रशिक्षित करतात.
‘अर्पण’ने २०२३ मध्ये क्षमता-बांधणी उपक्रमांच्या माध्यमातून २,३६,४०४ पेक्षा अधिक व्यावसायिकांना प्रशिक्षण दिले असून, २१ लाखांपेक्षा अधिक प्रौढ व्यक्ती आणि मुलांना त्यापासून फायदा मिळालेला आहे. या कार्यक्रमांची निर्मिती शिक्षक, मानसोपचार तज्ज्ञ आणि शासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती आणि कौशल्ये पुरवत, त्यांना वैयक्तिक सुरक्षा शिकवण्यास सज्ज करण्यासाठी झालेली आहे. सोबतच मुलांवर झालेल्या लैंगिक हल्ल्यांच्या घटना प्रभावीपणे हाताळण्यासाठीदेखील हे कार्यक्रम त्यांना मदत करतात. विशेष म्हणजे पहिल्यांदा शोषणाविषयी बोलते होत, मानसोपचार मिळवून शोषणाच्या दुष्परिणामांमधून सावरणाऱ्या आणि बरे होणाऱ्या मुलांची संख्या लक्षणीय आहे.
पालक आणि शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी, ‘अर्पण’ पूर्णत: समर्पित आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून, पालक व शिक्षक प्रत्येक मुलापर्यंत पोहोचत त्यांना लैंगिक शोषणापासून सुरक्षित ठेवण्यासाठी लागणारी माहिती व संसाधने पुरवतील, याची खात्री केली जाते. या महत्त्वपूर्ण प्रकल्पात शिक्षक व मुलांचा सहभाग अत्यंत मोलाचा असून, भारताचे भविष्य असणाऱ्या मुलांसाठी, हा प्रकल्प आशेचा किरण दाखवण्याचे काम करतो आहे.
त्याचबरोबर वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाचा राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय अभ्यासक्रमांमध्ये समावेश करण्यासाठी ‘अर्पण’ धोरणात्मक समर्थनामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून, शासकीय संस्थांसोबत संयुक्त तत्त्वावर काम करते. या अभिनव कार्यामुळे बाल सुरक्षा हा केवळ बोलण्याचा विषय न राहता शैक्षणिक आणि धोरणात्मक व्यवस्थांचा अविभाज्य भाग होईल, याची निश्चिती केली जाते.
बाल लैंगिक शोषणाची समस्या हाताळण्यासाठी, ‘अर्पण’च्या पुढाकाराने बाल सुरक्षा सप्ताह ही सामाजिक मोहीम राबवण्यात येते. यंदा ही मोहिम १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत संपन्न झाली. गोव्याच्या विविध भागांमध्ये याआधी पार पडलेला हा कार्यक्रम, यंदाही प्रभावीपणे राबवला जाईल, याकडे ‘अर्पण’ने कटाक्षाने लक्ष दिले. यंदा या मोहिमेची थीम होती – ‘नाही म्हणणे योग्य आहे’. याअंतर्गत गोव्यामध्ये विविध उपक्रम आयोजित करण्यात आले: १) ‘नाही म्हणणे योग्य आहे’ हा संदेश पसरवण्यासाठी भिंती रंगवण्याचा (वॉल पेंटिंग) कार्यक्रम. २) ‘नाही’ म्हणण्याची संस्कृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन, त्यादृष्टीने संवाद साधण्यासाठी पथनाट्य किंवा रोल-प्ले सादरीकरण, ३) शाळांमध्ये घेतलेली पोस्टर बनवण्याची स्पर्धा, जिथे मुलं वैयक्तिक सुरक्षा आणि ठामपणे नकार देण्याविषयक संदेश लिहू/रंगवू शकतील! ४) काव्यलेखन स्पर्धा, जिथे तरुण लेखक ‘ठामपणे नाही कसे म्हणायचे’, या विषयावर कल्पक संदेश लिहिण्यासाठी त्यांची सर्जनशीलता वापरू शकतील.
‘अर्पण’च्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापडिया म्हणाल्या – “आपण आपल्या संस्कृतीचा मान राखणं व तिचं पालन करणं महत्त्वाचं आहे. मात्र काही सांस्कृतिक रिवाज मुलांचे अधिकार आणि सुरक्षेच्या मार्गातील अडथळे ठरू शकतात. मुलांना वडिलधाऱ्यांचा आदर करायला शिकवताना, आपण त्यांना हेही सांगितलं पाहिजे की, त्यांना कधी अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटलं, तर ती ‘नाही’ म्हणू शकतात. नोव्हेंबर २०२३ मध्ये आयोजित केलेल्या ‘बाल सुरक्षा सप्ताहा’दरम्यान ‘अर्पण’ला याच सांस्कृतिक रिवाजाकडे लक्ष वेधणं गरजेचं वाटलं. कारण मुलं अनेकदा मोठ्यांना याच रिवाजामुळे ‘नाही’ म्हणू शकत नाहीत किंवा लैंगिक शोषण झालं तरी त्याविषयी इतरांना सांगू शकत नाहीत.”

‘अर्पण’विषयी
‘अर्पण’ ही जागतिक पातळीवर नावाजलेली पुरस्कारप्राप्त स्वयंसेवी संस्था आहे. भारतातील बाल लैंगिक शोषणाची समस्या नष्ट करण्यासाठी ‘अर्पण’ कार्यरत आहे.
मुंबईस्थित ‘अर्पण’, ही बाल लैंगिक शोषणाच्या समस्येवर प्रतिबंधात्मक तसेच मानसोपचारात्मक सुविधा पुरवणारी भारतातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेत १३० पेक्षा अधिक समर्पित व्यावसायिक तज्ज्ञ लहान मुले व प्रौढ व्यक्तींना या सुविधा पुरवण्यासाठी सज्ज असतात. शासकीय आणि अशासकीय यंत्रणेसाठी महत्त्वपूर्ण भागीदाराची भूमिका बजावणारी ‘अर्पण’ संस्था, भारतातील बाल लैंगिक शोषणाच्या प्रतिबंध व हस्तक्षेपाच्या क्षेत्रातील एक अग्रणी आवाज आहे. स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक व रचनात्मक बदलांना चालना देण्यासाठी ‘अर्पण’ संशोधन व समर्थन या दोन गोष्टींचा वापर करते.
बाल लैंगिक शोषणाच्या समस्येसंदर्भाने ‘अर्पण’ जागतिक स्तरावर वैचारिक नेतृत्व करते आहे. सोबतच या विषयावर काम करण्यासाठी ‘अर्पण’ने नावीन्यपूर्ण व अधिक परिणामकारक पद्धती विकसित केल्या आहेत. या पद्धती लहान मुले व पालक ते सरकारी संस्था आणि शिक्षक, अशा वैविध्यपूर्ण भागीदारांसोबत काम करण्यासाठी वापरल्या जातात. शाळेत जाणाऱ्या मुलांना आणि किशोरांना (वय वर्षे ४ ते १८) वैयक्तिक सुरक्षा शिकवणे हे ‘अर्पण’चे मुख्य काम आहे. जेणेकरून ते असुरक्षित परिस्थिती ओळखून त्याविरुद्ध मदत मागण्यात सक्षम होऊ शकतात. बाल लैंगिक शोषणास प्रतिबंध करण्यासह अशा घटना सुयोग्यपणे हाताळण्यासाठी उपयुक्त माहिती, दृष्टिकोन व कौशल्ये पुरवून ‘अर्पण’ पालकांना व शिक्षकांना प्रशिक्षित आणि सक्षम बनवते. २००७ पासून ‘अर्पण’ने ३१ लाखांपेक्षा अधिक मुले व प्रौढ व्यक्तींसोबत काम केले आहे. ‘अर्पण’ला आपल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ६ राष्ट्रीय आणि २ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें