सनबर्नचे ८२.५० लाखांचे पास चोरले, पाच कर्मचारी अटकेत
राज्यात काल २८ डिसेंबरपासून सनबर्नची धामधूम सुरू झाली आहे. २८ ते ३० डिसेंबरपर्यंत सुरू असलेल्या या महोत्सवासाठी जगभरातून लाखो पर्यटक येतात. देश विदेशांतील तरुणाईचा या इअर एंड पार्टीला अद्भुत प्रतिसाद मिळत आहे. सध्या सनबर्नच्या पाससाठीच राजकीय नेत्यांकडे मोठ्या प्रमाणात विचारणा होत आहे. कुठूनही आणि मिळेल त्या किमतीला सनबर्नचे पास मिळवायचेच आणि सनबर्नला जायचेच असे प्रत्येकास वाटते. याच गोष्टीच्या अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
वागातोर येथे आयोजित सनबर्न फेस्टीवलचे काऊंटर मधील ८२.५० लाखांचे ६०० पास चोरल्या प्रकरणी आयोजक कंपनीच्या पाच कर्मचाऱ्यांविरूद्ध हणजूण पोलिसांत गुन्हा नोंद केली आहे. संबंधित घटनेविषयीची फिर्याद सनबर्नचे सह-संयोजक अरविंद कुमार यांनी हणजुण पोलीस स्थानकात नोंदवली . पोलिसांनी कारवाई करत शिवम च्यारी, महेश गावस, मंजित गावस, यासिन मुल्ला आणि सिद्धगौडा हंचीनाल या संशयितांना अटक केली असून संबंधित कर्मचाऱ्यांवर आयपीसीच्या कलम ३८१ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.