डिसेंबर, २०२३
प्राण्यांच्या व्यथा अधोरेखित करण्यासाठी ‘वेगन’द्वारेव्हिडिओ आउटरीच इव्हेंट, वॉल पेंटिंगचे यशस्वी आयोजन
पणजी : समाजात अमानवी प्राण्यांवर होणारा गंभीर अन्याय आणि मनुष्य व प्राणी यांच्यातील अविभाज्य नाते अधोरेखित करण्यासाठी गोव्यातील तळागाळातील प्राणीमुक्ती कार्यकर्त्यांच्या ’वेगन’ या संघटनेने १७ डिसेंबर रोजी व्हिडिओद्वारे आपला संदेश तळागाळात पोहोचविण्यासाठी कदंब बस स्थानक पणजी आणि मिरामार समुद्रकिनार्यावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
’सर्वांसाठी मुक्ती’ या दोन दिवसीय मोहिमेच्या अनुषंगाने झालेल्या या कार्यक्रमात स्वयंसेवकांनी प्राण्यांच्या शोषणातून नफा कमावणार्या उद्योगांचे गुप्त फुटेज आणि लोकांच्या जीवनशैलीचा प्राण्यांवर कसा परिणाम होतो याचे व्हिडिओ दाखवण्यात आले.
क्षुल्लक हव्यासापोटी माणसे जनावरांना किती नाहक त्रास देतात, हे अधोरेखित करण्यासाठी संघटनेचे कार्यकर्तेही यावेळी पिंजर्यात बसले.
मानवेतर प्राण्यांशी भेदभाव करणारा पूर्वग्रह असलेल्या प्रजातीवादाबद्दल जनजागृती करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांनी एकदा म्हटले होते की, ‘कुठेही अन्याय झाल्यास सर्वत्र न्यायाला धोका असतो’. वंशवाद, लिंगभेद, जातीवाद आणि इतर प्रकारचा भेदभाव हा नैतिकदृष्ट्या चुकीचा आहे, हे जसे आपण समजून घेतो, त्याचप्रमाणे आपण प्रजातीवादाचा त्याग केला पाहिजे,’ असे मत या कार्यक्रमाच्या आयोजक असलेल्या ‘वेगन’च्या जेमिनी शेट्टीगर यांनी व्यक्त केले.
तत्कालीन पोर्तुगीज वसाहतवादी राजवटीपासून गोव्याच्या नागरिकांना स्वातंत्र्य मिळाल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 19 डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा गोवा मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम आयोजित करण्यात आली होती.
‘वेगनच्या दोन दिवसीय मोहिमेत शनिवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते आझाद मैदानापर्यंत वार्षिक गोवा प्राणी मुक्ती मोर्चाचा ही समावेश होता, ज्यात विविध भारतीय शहरांतील कार्यकर्ते सहभागी झाले होते.
डॉमिनोज पिझ्झाजवळील डॉ. टी. बी. कुन्हा रोडवर रविवारी झालेल्या अन्य जनजागृती कार्यक्रमात वॉल पेंटिंगचा समावेश होता. कार्यकर्ते या ठिकाणाहून गेल्यानंतर देखील हे वॉल पेंटिंग सर्वांच्या स्मरणात राहील. कायम प्राणीमुक्तीचा संदेश देणारे सशक्त माध्यम असणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.
सहसंघटक डॅनियल थॉमस म्हणाले, ’मी मांसाहार करूनच लहानाचा मोठा झालो, पण आपल्या निवडीमुळे असहाय्य जनावरांना होणारा अनावश्यक त्रास ओळखून मी वेगन झालो. वेगन असणे म्हणजे व्यावहारिकदृष्ट्या शक्य तितक्या प्रमाणात हे सुनिश्चित करणे आहे की कोणत्याही हेतूसाठी आपल्या कृतींमुळे प्राण्यांचे शोषण होणार नाही किंवा अन्यथा नुकसान होणार नाही. मांसाहार, अंडी, दुग्धजन्य पदार्थ/दूध आणि मध न खाण्याव्यतिरिक्त, वेगन असण्यामध्ये चामडे, लोकर, रेशीम, फर, मोती, प्राणीसंग्रहालये, प्राणी सर्कस, प्राणी-चाचणी केलेले कॉस्मेटिक उत्पादने इत्यादी टाळणे देखील समाविष्ट आहे.
‘वेगन’च्या कार्यकर्त्या त्रिशा बेणे यावेळी म्हणाल्या की, मला नेल्सन मंडेला यांचे वाक्य आठवते, ’ स्वतंत्र असणे म्हणजे केवळ स्वतःची साखळी तोडणे नव्हे, तर इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर आणि वाढ होईल अशा पद्धतीने जगणे होय.’ गुलामगिरीसारखे अत्याचार एकेकाळी सामूहिक जाणिवेत इतके रुजले होते की ते तेव्हा शाश्वत मानले जायचे. पण दडपशाही खोलवर रुजलेली आणि व्यापक वाटत असली तरी सकारात्मक बदल साधता येतो, हे इतिहासाने दाखवून दिले आहे. लोकांच्या निवडीमुळे कोट्यवधी प्राण्यांवर होणारे आजीवन दु:ख दूर करण्यासाठी सर्वांनी मदत करावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.