...हा तर संस्कृतीप्रिय गोमांतकीयांचा विजय ! – हिंदु जनजागृती समिती
पणजी, ४ जानेवारी – ‘सनबर्न’चे आयोजक हरिंद्र सिंग यांनी ‘वर्ष २०२३ मधला गोव्यातला ‘सनबर्न’ महोत्सव माझा शेवटचा ‘सनबर्न’ आहे, असा ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमात प्रसारित केला आहे. गोव्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लावून पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारा, सामाजिक स्वास्थ बिघडवणारा, युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारा, अमली पदार्थ व्यवहारासाठी सदैव चर्चेत असलेला आणि गोव्याची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलीन करणारा गोव्यातील ‘सनबर्न २०२३’ महोत्सव अखेरचा ठरो. तसेच हा एकप्रकारे हा संस्कृतीप्रिय गोमांतकीयांचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.
हिंदु जनजागृती समितीने संस्कृतीद्रोही ‘सनबर्न’ महोत्सवाला प्रारंभापासून विरोध दर्शवला आहे. विकृतीला प्रोत्साहन देणारा आणि युवापिढीला अंमली पदार्थांच्या गर्तेत ढकलणाऱ्या या महोत्सवात अनेक युवकांचा बळी गेला आहे. युवा पिढीला नासवणारे ‘सनबर्न’/‘ईडीएम’ सारखे फेस्टिव्हल गोव्यातून कायमचे हद्दपार करावेत आणि गोव्याची सांस्कृतिक अस्मिता जपावी, अशी हिंदु जनजागृती समितीची कायम भूमिका आहे. असे विकृत प्रकार गोव्यात पुन्हा येऊ नये म्हणून गोमांतकीयांनी अधिक जागृत रहण्याची आज आवश्यकता आहे.