गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे डॉ. गुरुदास नाटेकर यांचा सत्कार

अस्नोडा वाताहार
गोमंतक साहित्य सेवक मंडळ आयोजित श्री बलराम शिक्षण संस्था काणकोण आणि राजभाषा संचालनालय, पणजी यांच्या सौजन्याने आयोजित २९ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनात गोव्यातील नामवंत साहित्यिक आणि संशोधक डॉ. गुरुदास भालचंद्र नाटेकर यांचा त्यांनी मराठी साहित्यासाठी दिलेल्या योगदानासाठी सत्कार करण्यात येणार आहे. हा सत्कार समारंभ शनिवार दि. १३.०१.२०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार असून, हा समारंभ प्रा. स. शं. देसाई साहित्यनगरी, आमोणे – काणकोण येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रमुख पाहुण्या महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिका सोनाली प्रकाश नवांगुळ, स्वागताध्यक्ष गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर व गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे इतर पदाधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
डॉ. नाटेकर यांच्या आजवर सात कादंबऱ्या, सतरा वैचारिक लेखसंग्रह, दोन नाटके, दोन कवितासंग्रह व एक संशोधनपर पुस्तक अशी एकूण एकोणतीस पुस्तके प्रकाशित झालेली आहे.
गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे म्हापसा येथे झालेले ‘ अखिल गोमंतक मराठी साहित्य संमेलन ‘, प्रागतिक विचार मंच बोरी तर्फे म्हापसा येथे झालेले ‘ प्रागतिक संमेलन ‘, कोकण मराठी परिषद, गोवा तर्फे पणजी येथे आयोजित ‘ शेकोटी साहित्य संमेलन ‘ व माधव-राघव प्रकाशन ताळगावतर्फे पणजी येथे झालेले ‘ अखिल गोवा मराठी साहित्य संमेलन ‘ अशा काही महत्वपूर्ण साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होण्याचा बहुमान डॉ. नाटेकर यांना प्राप्त झाला आहे.