नग्नता आणि अश्लीलता यांना नेहमी प्रोत्साहन दिल्याने वादग्रस्त ठरलेली मॉडेल पूनम पांडे (३२) हिने आता चक्रमपण केल्याचे समोर आले आहे. सर्व्हायकल कॅन्सरसारख्या गंभीर विषयावर जागृती करण्यासाठी तिने मृत्यूचे नाटक केल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘सर्व्हायकल कॅन्सरवर समाजात जागरूकता यावी, यासाठी मी मृत्यूचे नाटक केले होते’, असे खुद्द तिनेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून स्पष्ट केले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करताना सर्व्हायकल कॅन्सरचे देशभरातून उच्चाटन करण्यासाठी ९ ते १४ वर्षे वयोगटातील सर्व मुलींचे लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर या कॅन्सरसंदर्भात विविध बातम्या देशभरातील प्रसारमाध्यमांवर झळकू लागल्या होत्या. तवा गरम असल्याचे लक्षात आल्यानंतर पूनमनेही स्वतःकडे लक्ष वेधण्याची संधी सोडली नाही.
काल दुपारी अचानक पूनमच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा सर्व्हायकल कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याची पोस्ट झळकली. तिच्या व्यवस्थापकाने ही पोस्ट केली होती.
‘आजची सकाळ आमच्यासाठी दुःखद आहे. आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे पूनम गमावली आहे. तिला भेटलेले प्रत्येकजण तिच्यावर प्रेम करायचे. ही दुःखाची वेळ आहे. तिने शेअर केलेल्या प्रत्येक गोष्टीमुळे ती नेहमीच स्मरणात राहील’, असे व्यवस्थापकाने इन्स्टावर पोस्ट केले होते.
पूनम हिने गोव्यातील चापोली धरण परिसरात २०२० साली न्यूड फोटोशूट आणि अश्लील चित्रीकरण केले होते. याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गोव्यातील नागरिकांच्या संतापाचा पारा चढला होता. या प्रकरणात ती आणि तिचा पती सॅम बॉम्बे यांच्या विरोधात न्यायालयात खटला चालू आहे. तत्पूर्वी तिने अनेक वादग्रस्त कारनामे केल्यामुळे तिच्यावर टीकेची झोड उठली होती. आता तिच्या या चक्रमपणामुळे तिचे चाहतेही चक्रावून गेले आहेत.या पोस्टमुळे तिच्या चाहत्यांना मात्र धक्का बसला होता. हे खरे आहे का? असा प्रश्न ते विचारू लागले होते. तिचे अकाऊंट कोणीतरी हॅक केले असावे, असा संशयही व्यक्त करण्यात येत होता. मात्र, अचानक आज सकाळी स्वतः पूनमने व्हीडीओ जारी करत ती जिवंत असल्याचे जाहीर केले. तसेच हे नाटक सर्व्हायकल कॅन्सरवर जागरूतीसाठी केले होते, अशी मखलाशीही तिने जोडली आहे.