ऑगस्ट २८, २०२४
फरेरा यांच्या मध्यस्थीनंतर गोवा विद्यापीठाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील स्वयंसेवकांना प्रदान केले गुण
पणजी : हळदोणाचे आमदार अॅड. कार्लोस आल्वारेस फरेरा यांच्या मध्यस्थीनंतर गोवा विद्यापीठाने गेल्या वर्षीच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्वेच्छेने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना गुण/क्रेडिट देण्याचा प्रश्न सोडविला आहे.
गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांनी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेदरम्यान स्वयंसेवक म्हणून सेवा देणार्या संलग्नित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना गुण/ क्रेडिट देण्यास मान्यता दिली आहे.
विद्यापीठाने अद्याप त्यांना गुण/क्रेडिट दिलेले नाही, अशी माहिती विद्यार्थ्यांकडून फरेरा यांना प्राप्त झाली होती. यानंतर त्यांनी पुढाकार घेत ही समस्या सोडविण्यास पुढाकार घेतला होता.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी सर्वोत्तम कामगिरी करणार्या आपल्या तरुणांच्या भवितव्याशी आपण खेळू नये. याबाबत विद्यापीठ हलगर्जीपणा करीत होते. परीक्षेसाठी अर्ज भरण्याची तारीख जवळ येत असल्याने विद्यार्थ्यांना लवकरच गुण मिळतील, अशी अपेक्षा होती.
कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सातत्याने संपर्क करून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्वयंसेवक म्हणून जबाबदारी सांभाळूनही गुण/क्रेडिट देण्यास विलंब होत असल्यामुळे या विषयी लक्ष घालण्याची माझ्याकडे विनंती केली. गोवा विद्यापीठ कायद्यानुसार चालते असे कारण देताना कुलसचिवांच्या परिपत्रकानंतरही गुण देण्यास विलंब होत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. फरेरा यांनी यानंतर कुलसचिवांना हा बद्दल विचारणा करत हे फसवणुकीचे प्रकरण असेल तर कायदेशीर कारवाई करावी लागेल, असे सांगितले होते.
दुसर्या दिवशी कुलसचिवांनी व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे संपर्क साधून कुलगुरूंशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आणि विद्यापीठ हे परिपत्रक विचारात घेऊन सुधारित निकाल जाहीर करेल, असे फरेरा यांनी सांगितले.