*गोवा पर्यटन विभाग वॉव अवॉर्ड मिडल ईस्ट २०२४ मध्ये सर्वोत्कृष्ट वेडिंग डेस्टिनेशन म्हणून सन्मानित*
*गोवा, भारत, 20 सप्टेंबर २०२४* – गोवा पर्यटन विभागास दुबई, संयुक्त अरब अमिरात येथे आयोजित वॉव अवॉर्ड्स मिडल ईस्ट 2024 मध्ये प्रतिष्ठित `बेस्ट वेडिंग डेस्टिनेशन इन इंडिया’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुबईतील भारतीय वाणिज्य दूत श्री के. कालिमुथू (आर्थिक, व्यापार, वाणिज्य आणि शिक्षण) यांनी गोवा पर्यटन विभागाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. इव्हेंट एफएक्युज (EVENTFAQS) मीडिया आणि वॉव (WOW) अवॉर्ड्स मिडल इस्ट द्वारे प्रदान करण्यात आलेली ही ओळख, विवाहसोहळे आणि लक्झरी सेलिब्रेशनसाठी एक प्रमुख गंतव्यस्थान म्हणून गोव्याचे स्थान दृढ करते.
वेडिंग डेस्टिनेशन म्हणून जनसामान्यांमध्ये गोव्याविषयी असलेल्या आकर्षणावर या पुरस्काराने शिक्कामोर्तब केले आहे. विलोभनीय समुद्रकिनारे, आलिशान रिसॉर्ट्स आणि वैविध्यपूर्ण स्थळांसह, गोवा समुद्रकिनाऱ्यावरील समारंभांपासून ते भव्य सोहळ्यांपर्यंत गंतव्य विवाहासाठी योग्य पार्श्वभूमी प्रदान करते.
माननीय पर्यटन मंत्री श्री. रोहन अ. खंवटे यांनी या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना सांगितले की, “ही मान्यता पर्यटन विभागाचे तसेच आमच्या उद्योग भागीदारांचे अविस्मरणीय अनुभव देण्याचे समर्पण दर्शवते. गोव्यात पालोळे, अगोंदा आणि मोरजी समुद्रकिनारे यासारखी नयनरम्य लग्नाची ठिकाणे, तसेच ताज सिदादे गोवा, डब्ल्यु गोवा, आणि अलिला दिवा गोवा (Alila Diwa Goa सारखी आलिशान रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत, जे त्यांच्या जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सेवेसाठी प्रसिद्ध आहेत. हा पुरस्कार आम्ही गोव्याला डेस्टिनेशन वेडिंगसाठी जागतिक स्थळ म्हणून स्थान देण्यासाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा पुरावा आहे. आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करण्यासाठी आमच्या पर्यटन पायाभूत सुविधा आणखी वृद्धिंगत करण्यास हा पुरस्कार प्रेरित करेल.”
गोवा पर्यटन विभागाचे संचालक आणि जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील अंचिपाका, आयएएस यांनी सांगितले की, “नेत्रदीपक निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या डेस्टिनेशन वेडिंगच्या शोधात असलेल्या जोडप्यांसाठी गोवा हे नेहमीच पसंतीचे ठिकाण राहिले आहे. गोव्यात पारंपारिक आणि आधुनिक विवाह स्थळांचे अतुलनीय मिश्रण उपलब्ध आहे, ज्यामुळे ते सर्व प्रकारच्या उत्सवांसाठी योग्य पर्याय बनते. जागतिक स्तरावर या संभाव्यतेचा आणखी प्रचार करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”
गोवा पर्यटन विभाग आपल्या पुनर्संचयित पर्यटन उद्दिष्टांशी मेळ साधत पर्यावरणास अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देते. स्थानिक कारागिरांना सामील करून घेते. अशा प्रकारे शाश्वतता व समुदाय प्रतिबद्धतेला पाठिंबा देते. हा पुरस्कार गोव्याला केवळ एक प्रमुख वेडिंग डेस्टिनेशनच नाही तर जागतिक दर्जाच्या पर्यटन अनुभवांचे केंद्र म्हणून दाखवण्याच्या राज्याच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. गोवा पर्यटन विभाग आपल्या पर्यटन सेवांमध्ये वाढ करत असल्याने, गोव्याला अद्वितीय बनवणारे अतुलनीय आकर्षण आणि सौंदर्य शोधण्यासाठी जगभरातील जोडप्यांना आणि प्रवाशांना आमंत्रित करते.
***