भाऊबीज (यमद्वितीया)
या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची शास्त्रीय माहिती या लेखाच्या माध्यमातून करून घेऊया.
- तिथी: कार्तिक शुद्ध द्वितीया
- इतिहास: या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला गेला; म्हणून या दिवसाला ‘यमद्वितीया’ असे नाव मिळाले.
- महत्त्व:
अपमृत्यू येऊ नये म्हणून धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि यमद्वितीया या दिवशी मृत्यूची देवता ‘यमधर्म’ हिचे पूजन करतात.
‘या दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवायला जातो अन् त्या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे करतो.’
हा दिवस मातेच्या गर्भातून जन्म घेतलेल्या जिवांना एकमेकांविषयी वाटणारा जिव्हाळा व्यक्त करण्याचा दिवस आहे.
या दिवशी जी बहीण आपल्या भावासाठी श्री यमाईदेवीकडे काही मागणे मागते, तिच्या भावानुसार ते भावाला मिळते. त्यामुळे तिचे भावाशी असलेले देवाण-घेवाण हिशोब काही प्रमाणात संपुष्टात येतात.
- सण साजरा करण्याची पद्धत
यमतर्पण, यमदीपदान आणि यमाची प्रार्थना करणे – अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।’ असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करावे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. ‘याच दिवशी यमाला दीपदान करायचे असते. यम ही मृत्यू आणि धर्म यांची देवता आहे. ‘प्रत्येक माणसाला मरण आहे’, ही जाणीव सतत असणे आवश्यक आहे; कारण त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कार्य वा धनाचा अपव्यय होणार नाही. तेव्हा यमाला दीपदान करून सांगायचे, ‘हे यमा, या दीपाप्रमाणे आम्ही सतर्क आहोत, जागरूक आहोत. जागरूकतेचे, प्रकाशाचे प्रतीक असलेला दीप तुला अर्पण करीत आहोत, त्याचा स्वीकार कर. तुझे आगमन केव्हा होईल, हे आम्हाला माहीत नाही; म्हणून आम्ही आमचा हिशोब वेळच्या वेळी ठेवतो, ज्यामुळे अर्धवट राहिलेल्याची चिंता करण्याची वेळ येत नाही; कारण आम्हाला माहीत आहे की, तू अचानक कधीही येऊ शकतोस.’ – परात्पर गुरु परशराम माधव पांडे महाराज
बहिणीने भावाला ओवाळणे – या दिवशी भावाने बहिणीकडे जावे आणि बहिणीने भावाला ओवाळावे. एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल, तर तिने कोणाही परपुरुषाला भाऊ मानून त्याला ओवाळावे. ते शक्य नसल्यास चंद्राला भाऊ मानून ओवाळावे. `या दिवशी कोणत्याही पुरुषाने स्वतःच्या घरी पत्नीच्या हातचे अन्न घ्यायचे नसते. त्याने बहिणीच्या घरी जावे अन् तिला वस्त्रालंकार वगैरे देऊन तिच्या घरी भोजन करावे. सख्खी बहीण नसेल, तर कोणत्याही बहिणीकडे किंवा अन्य कोणत्याही स्त्रीला भगिनी मानून तिच्याकडे जेवावे.’
- भाऊबीजेलाभगिनींनास्वसंरक्षणार्थ समर्थ करूया !
‘कित्येक भगिनींवर आज बलात्कार होतो, कित्येकींचे संसार उद्ध्वस्त होतात. एकतर्फी प्रेमातून कित्येकींची उघड उघड हत्याही होते. समाजाच्या प्रेतवत्, म्हणजे क्षात्रधर्महीन मानसिकतेचे हे प्रतीक आहे. स्वतःमध्ये क्षात्रतेज जागवून शारीरिक अन् मानसिक दृष्ट्या सबळ होऊन आपण आपल्या भगिनींचे रक्षण केले पाहिजे. याचबरोबर भगिनींनाही स्वसंरक्षणार्थ सिद्ध होण्यासाठी प्रोत्साहित आणि प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. हीच त्यांच्यासाठी भाऊबीजेची खरी भेट ठरेल. दीपावलीच्या निमित्ताने समाज, राष्ट्र अन् धर्म यांसाठी काहीतरी करण्यासाठी यथाशक्ती पाऊल उचलले, तरच हा सण खर्या अर्थाने साजरा होईल.’
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
संकलन- श्री तुळशीदास गांजेकर, साखळी
संपर्क- ९३७०९५८१३२