*गोवा पर्यटनाकडून सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा २०२५मध्ये संस्कृती आणि कलाकुसरीचे सादरीकरण*
*गोवा, ८ फेब्रुवारी 2025*: सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा २०२५ शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरू झाला. गोवा पर्यटन या मेळ्यात राज्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, नवीन पर्यटन उपक्रम, कला, हस्तकला आणि परंपरा अशा दोलायमान दालनासह भव्य ठसा उमटवत आहे. पहिल्या दिवसापासूनच, गोवा पर्यटनाचे दालन आकर्षणाचे केंद्र बनले असून उत्साही अभ्यागतांना आकर्षित करत आहे.
गोवा पर्यटनाचे दालन हे अभ्यागतांसाठी एक व्हिज्युअल मेजवानी आहे. हे दालन राज्यातील अद्वितीय परंपरेची झलक सादर करते. येथे लाइव्ह सादरीकरण, हस्तकलेची प्रात्यक्षिके आणि पारंपारिक कलाकृतींच्या प्रदर्शनांद्वारे गोव्याच्या विविध सांस्कृतिक सेवांचे प्रदर्शन होते.
हरियाणा सरकारचे माननीय पर्यटन आणि वारसा मंत्री, डॉ. अरविंद कुमार यांनी सपत्नीक पहिल्या दिवशीच गोवा पर्यटनाच्या दालनाला भेट दिली. गोवा पर्यटनाच्या दालनात जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक श्री दीपक नार्वेकर आणि पर्यटन विभागाचे श्री सुदत्त कांबळी यांनी त्यांचे स्वागत केले.
मंत्री गोमंतकीय लोकनृत्य सादरीकरणाचे साक्षीदार झाले आणि गोव्यातील कारागिरांनी दाखवलेल्या हस्तकलेचे प्रदर्शन त्यांना आवडले. यावेळी बोलताना मंत्री महोदयांनी आंतरराष्ट्रीय मेळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याबद्दल गोवा पर्यटनाचे आभार मानले आणि लोकनृत्य कलाकारांचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केले.
गोवा पर्यटनाचे दालन नवनवीन उपक्रमांवर लक्ष केंद्रित करत आहे. यात पुनरुत्पादक पर्यटन, एकादशा तीर्थ, समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडील गोवा, एमआयसीई, पाककृती, धार्मिक स्थळे, साहसी पर्यटन तसेच शिवजयंती, गोवा कार्निव्हल (२८ फेब्रुवारी – ४ मार्च) आणि शिगमोत्सव (१५ मार्च – २९ मार्च) या आगामी उत्सवांविषयी अंतर्दृष्टी देण्यात आली आहे. येथे खरेदीसाठी गोव्यातील अस्सल हस्तकला आणि हस्तनिर्मित उत्पादने आहेत. खरेदीदारांसाठी ही आनंददायी बाब आहे. रंगीबेरंगी भांडी ते उत्तम कापड आणि पारंपारिक उपकरणे याठिकाणी खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
पर्यटन आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, श्री रोहन ए. खंवटे यांनी सांगितले, की “गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांसमोर दाखवण्यासाठी सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आम्हाला
एक अद्भुत असे व्यासपीठ प्रदान करतो. आमच्या दालनाच्या माध्यमातून, आम्ही विविध परंपरा, अद्वितीय हस्तकला आणि उत्सवांवर प्रकाश टाकण्याचे उद्दिष्ट ठेवतो, ज्यामुळे गोवा वर्षभरासाठी आवडते गंतव्यस्थान बनते. या आंतरराष्ट्रीय मेळ्यात गोव्याचे अस्सल सार अनुभवण्यासाठी आम्ही सर्वांना आमंत्रित करतो.”
जीटीडीसीचे उपमहाव्यवस्थापक श्री दीपक नार्वेकर आणि पर्यटन विभागातील श्री सुदत्त कांबळी यांच्या नेतृत्वाखालील गोवा पर्यटन शिष्टमंडळाने, गोव्यातील विविध पर्यटन सेवा सादर करून, शाश्वत प्रवासाच्या अनुभवांना चालना देण्यासाठी माध्यमे आणि अभ्यागतांशी थेट संवाद साधला.
केंद्रीय पर्यटन आणि संस्कृती मंत्रालय, वस्त्रोद्योग मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांनी हरियाणा पर्यटनाच्या सहकार्याने आयोजित केलेला, हा जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेला मेळा ७ ते २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू असेल. भारताच्या पारंपारिक हस्तकला, कला आणि पाककृतींचा आनंद साजरा करणारा हा मेळा, वर्षाला लाखो अभ्यागतांना आकर्षित करणारा जगातील सर्वात मोठा सांस्कृतिक महोत्सव आहे.
सजीव आणि आकर्षक सादरीकरणासह, गोवा पर्यटनाचे हे दालन म्हणजे खरोखरच गोव्याची अस्सल बाजू दाखविणारा केंद्रबिंदू आहे. सूरजकुंड मेळ्यातील अभ्यागतांना, गोव्याच्या कला आणि संस्कृतीच्या या उत्सवात मग्न होण्यासाठी आणि गोव्याच्या समृद्ध वारशाचा अमूल्य हिस्सा घरी घेऊन जाण्यासाठी गोवा पर्यटन आमंत्रित करीत आहे.