*पर्वरीमध्ये उद्या शिवशाही अवतरणार*
*शिवशाहीचा साक्षीदार होण्यास गोवा सज्ज – हाऊसिंग बोर्ड ग्राउंड, सर्व्हिस रोड, पर्वरी येथे २२ फेब्रुवारीला फिरत्या रंगमंचावरील भव्य प्रयोग*
अखिल महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि गोमंतक यांचे अतिशय भावनिक असे नाते आहे. साडेतीनशे वर्षांहून अधिक काल लोटला तरीही हे नाते अजून कायमच नाही तर अधिक बहरून येत आहे. हे नाते पुढे संभाजी महाराजांनी कायम राखले आणि स्वराज्यासाठी लढणाऱ्या या मर्द मराठा राजांनी आपल्या मावळ्यांसह पोर्तुगीजांना जबरदस्त हिसका दाखवला. मात्र हा तेजस्वी इतिहास शालेय माध्यमातून मात्र शिकवला जाऊ शकला नाही.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे गोव्याशी नाते केवळ राजकीय स्वरूपाचे नसून सामाजिक आणि सांस्कृतिक होते. शिवाजी महाराजांमुळे जशी भारतीयांमध्ये परकीय राजवटीविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण झाली, तशीच गोमंतकातील हिंदू, ख्रिस्ती, मुस्लिम या सर्व धर्मीयांची स्वातंत्र्यलढ्यामागील प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची होती.
डिचोली येथील ‘निमुजगा’ सारख्या वस्तूंचे जतन होणे आवश्याक आहे. गोव्यामधील धर्मांतर हा तर एक रक्तरंजित अध्याय होता आणि त्याची सविस्तर वर्णने उपलब्ध आहेत. पोर्तुगीज दर्यावर्दी होते त्यामुळे १५१० मध्ये त्यांचा येथे झालेला शिरकाव नेस्तनाबूत करायला १९६१ साल उजाडावे लागले.
छत्रपती शिवाजी महाराज गोमंतकात आले त्याला साडेतीनशे वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. पोर्तुगीजांचे सुसज्ज आरमार निरीक्षण करताना महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची उभारणी केली. आजची भारतीय नौसेना त्यांचीच देणगी आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीतील पहिली लेखी स्वरूपाची माहिती गोव्यातून आलेली आहे. कॉस्मे-द-गुआर्दा या पोर्तुगीज प्रवाशाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत उत्सुकता होती. त्याचे साहजिक कारण म्हणजे स्थानिक जनतेला त्यांच्या बद्दल नितांत आदर होता. हा प्रवासी नंतर कोल्हापूर येथेही गेल्याचे दिसते. कोणतीही भीती न बाळगता या प्रवाशाने गद किल्ले यांची वर्णने तसेच महाराजांचे धैर्य, मानवता आणि राजकीय तसेच सामाजिक कौशल्ये यांचाही वेध घेतला आणि जगाचे लक्ष वेधून घेतले.
शिवशाही हा एक भव्य सोहळा नव्हे तर आता तो देखण्या अशा फिरत्या रंगमंचावर प्रेक्षकांच्या समोर उलगडणार आहे. हा प्रयोग गोमंतकात २२ फेब्रुवारी २०२५ रोजी हाऊसिंग बोर्ड ग्राउंड, सर्व्हिस रोड, पर्वरी येथे सायंकाळी ६ वाजता होत असून कार्यक्रम गोवा शासनाच्या पर्यटन विभागाने आयोजित केला आहे. केवळ गोव्यातच नव्हे तर आसपासच्या कोल्हापूरपासून तो इतर अनेक भागात देखील ‘शिवशाही’चा उत्साह शिगेला पोचला असून मिळेल त्या मार्गाने जनता आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी गोव्याकडे निघाली आहे.