हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियान’चा
वर्धापनदिन आहे. त्या निमित्ताने…
‘सुराज्य अभियाना’ची ८ वर्षे : जनतेच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणारी प्रभावी चळवळ !
आज देशात सर्वच क्षेत्रांत भ्रष्टाचाराचे जाळे पसरले आहे. सामान्य जनता हे पाहून अस्वस्थ होते; पण बहुतेकदा ते कसे लढायचे, हे माहिती नसल्याने काही करू शकत नाहीत. योग्य साहाय्य मिळत नसल्याने ती नाईलाजाने सर्व अन्याय मुकाटपणे सहन करते. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने समाजसाहाय्य करण्याच्या उद्देशाने वर्ष २०१७ मध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘सुराज्य अभियान’ चालू केले. शासकीय आणि सामाजिक क्षेत्रांतील अन्याय, अपप्रकार, भ्रष्टाचार याविरुद्ध घटनात्मक मार्गाने लढा देणे अन् जनतेत जागरूकता निर्माण करणे, हे अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. गेल्या ८ वर्षांत ‘सुराज्य अभियाना’ने सातत्यपूर्ण प्रयत्नांतून अनेक महत्त्वाचे प्रश्न हाताळले आणि समाजात सकारात्मक पालट घडवून आणले.
‘सुराज्य अभियाना’ने राबवलेल्या मोहिमांचा गोषवारा :
या ८ वर्षांत ‘सुराज्य अभियाना’ने केलेल्या कृतींचा थोडक्यात गोषवारा सांगायचा झाला, तर अन्नातील भेसळी विरोधात जनजागृती केली, तसेच चक्रीवादळ निवारणासाठी बहुउद्देशीय केंद्र स्थापनेची मागणी करून शासनाचे लक्ष वेधले. धोकादायक पूल आणि रस्ते दुरुस्तीच्या मागणीसाठी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला. सणासुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सने प्रवाशांकडून होणारी लूट थांबवण्यासाठी जिल्हास्तरापासून देहलीतील मंत्रालयापर्यंत प्रयत्न केले. औषधांच्या अनावश्यक वाढलेल्या किमतींवर नियंत्रण आणण्यासाठी सतत प्रयत्न केले. पंढरपूर आणि अन्य तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी रिक्शाच्या भाड्याविषयी असलेल्या अनियमिततेच्या विरुद्ध प्रशासनाला कारवाईस भाग पाडले. महापालिकांमध्ये वसूल न झालेल्या वेतनेतर आगाऊ रकमांच्या प्रकरणांचा माहिती अधिकारातून उलगडा करून त्यांची वसुली करण्यासाठी पाठपुरावा केला आणि यातून महाराष्ट्र सरकारची कोट्यवधी रुपयांची थकीत रक्कम प्रशासनाने वसूल केली.
महाराष्ट्र राज्यातील सर्वच जिल्ह्यांत उभारणी झाल्यानंतर बंद पडलेले ‘ट्रॉमा केअर सेंटर’ कार्यान्वित करण्यासाठी विशेष मोहिम राबवली. परिणामी त्यातील काही ठिकाणची ‘ट्रॉमा केअर सेंटर’ कार्यान्वित झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येथील आंबा संशोधन केंद्रातील कोट्यवधी निधीच्या गैरवापराविषयी प्रश्न उपस्थित केले. औद्योगिक सांडपाण्यामुळे होणार्या पाणीप्रदूषणाविरोधात राष्ट्रीय हरित लवादात याचिका प्रविष्ट (दाखल) केली. एवढेच नव्हे, तर १० रुपयांची नाणी स्वीकारण्यास नकार देणार्या दुकानदारांच्या विरोधात महाराष्ट्र आणि गोवा येथील विविध जिल्ह्यात जनजागृती करण्याविषयी प्रशासनास भाग पाडले. त्यामुळे आज अनेक ठिकाणी १० रुपयांची नाणी स्वीकारली जात आहेत.
विविध रेल्वे स्थानकांवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढवण्यासाठी बंद पडलेले शेकडो ‘वॉटर व्हेडिंग मशिन्स’ कार्यान्वित करण्यासाठी पाठपुरावा केला, तसेच रेल्वेतील खाद्यपदार्थ आणि ‘रेल नीर’ (पाणी) यांचे वाढीव दर थांबवण्यासाठी प्रयत्न केले. धर्मादाय रुग्णालयाच्या कार्यपद्धतीतील गैरप्रकारांवर लक्ष वेधून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यांत विविध ठिकाणी निवेदने दिली अन् त्या संदर्भात कारवाईसाठी मागणी केली. रस्त्यावर चालू असलेल्या अपूर्ण कामांमुळे होणार्या अपघातांवर उपाययोजना राबवण्यासाठी राष्ट्रीय रस्ते महामार्ग प्राधिकरणाकडे सतत पाठपुरावा केला. महत्त्वाचे म्हणजे अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी पोलिसांचा पोशाख घालून ‘ऑनलाईन’ जुगार खेळण्यास प्रोत्साहन देण्याच्या विज्ञापनाविषयी निषेध व्यक्त करून कायदेशीर कारवाईची मागणी केली. यासह ‘बेस्ट’ बसमधील मराठी भाषेतील अशुद्ध फलक शुद्ध करण्याविषयीची मागणी करून ते शुद्ध भाषेत करून घेण्यात आले.
आवाहन
‘सुराज्य अभियाना’ने अशा प्रकारे विविध क्षेत्रांमध्ये सक्रीय राहून सकारात्मक पालट घडवून आणले आहेत. आपण सर्वांनीही या चळवळीचा भाग होऊन स्वतःच्या न्याय हक्कांसाठी सजगपणे उभे रहावे. आपल्या आजूबाजूला अन्यायकारक घटना घडत असतील, तर ‘सुराज्य अभियाना’शी अवश्य संपर्क साधा. चला, आपण सर्वांनी एकत्र येऊन अधिक प्रभावी पालट घडवूया !
आपला विश्वासू,
श्री. अभिषेक मुरुकटे,
समन्वयक, सुराज्य अभियान,(संपर्क : ९८६७५५८३८४)
संगणकीय पत्ता : surajya.abhiyan@hindujagruti.org
‘एक्स’ खाते : @surajyacampaig