*गोव्यातील स्पिंटलीला स्टार्टअप इंडिया मिशनअंतर्गत प्रशंसा प्रमाणपत्र*
गोव्यातील दोन अभियंत्यांनी प्रवेश नियंत्रण सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित करून स्थापन केलेले ‘स्पिंटली’, हे स्मार्ट इमारती आणि सुरक्षित जागेसाठी जागतिक सोल्युशन म्हणून विकसित झाले आहे. याच्या वायरलेस, क्लाउड-आधारित प्रणालीला आता भारतातील सर्वात जलद-स्केलिंग आयओटी उपक्रमांपैकी एक म्हणून स्थान दिले जात आहे.
गेल्या आठवड्यात, ‘स्पिंटली’ला *संकल्प से सिद्धी* महोत्सवात, मोदी सरकारच्या ११ वर्षांच्या आणि मोदी ३.०च्या प्रथम वर्ष निमित्ताने स्टार्टअप इंडिया मिशन अंतर्गत, नावीन्यपूर्णता आणि उद्योजकतेतील योगदानाबद्दल प्रशंसा प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र माननीय *मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत* यांनी *माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स मंत्री श्री रोहन अ. खंवटे* यांच्या उपस्थितीत प्रदान केले, ज्यांच्या नेतृत्वामुळे गोव्याचे नावीन्यपूर्ण केंद्र बनण्याचे स्वप्न अधिक बळकट झाले आहे. हा केवळ ‘स्पिंटली’च्या संस्थापकांसाठीच नाही तर गोव्यातील वाढत्या स्टार्टअप परिसंस्थेसाठी अभिमानाचा क्षण आहे.
सह-संस्थापक माल्कम डिसोझा (सीटीओ) आणि रोहिन पारकर (सीईओ) यांनी केवळ उत्पादन तयार केले नसून त्यांनी विश्वास निर्माण केला आहे. स्टार्टअप धोरणाअंतर्गत *सीड कॅपिटल योजनेच्या* पहिल्या प्राप्तकर्त्यांपैकी ते एक होते. हा *माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स खात्याअंतर्गत* स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेलद्वारे प्रशासित केलेला राज्य-समर्थित उपक्रम आहे. सुरुवातीच्या गुंतवणुकीमुळे त्यांना व्हेंचर कॅपिटल येण्यापूर्वीच निर्मिती, चाचणी आणि विस्तार करण्यास मदत झाली.
“ही मिळालेली ओळख आमच्या टीमची आवड आणि चिकाटी दर्शवते. गोव्यातून जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान निर्माण करणे, हे नेहमीच आमचे ध्येय राहिले आहे आणि राज्याने आम्हाला त्याचा विस्तार करण्यासाठी पाया आणि लाँचपॅड दोन्ही दिले आहेत,” असे *स्पिंटलीचे सह-संस्थापक आणि सीटीओ माल्कम डिसोझा* म्हणाले.
आज, स्पिंटली हे गोवा आणि अमेरिकेतून कार्यरत असून त्यांनी भारत आणि विदेशातील गुंतवणूकदारांकडून ५० कोटी रुपये उभारले आहेत आणि त्याचे मूल्य ३०० कोटी रुपये आहे. पण खरी कहाणी याहून देखील मोठी आहे: गोवा फक्त आराम करण्याचे ठिकाण नसून ते व्यवसाय वाढविण्याचे केंद्र देखील बनत आहे.
वाढत्या पायाभूत सुविधा, निधी उपलब्धता आणि स्टार्टअप समुदायाला गती मिळत असल्याने, गोवा हे भारतातील एक पसंतीचे स्टार्टअप स्थळ म्हणून उदयास येत आहे. आणि जसे स्पिंटलीने दाखवून दिले आहे, की पुढचा मोठा नवोपक्रम हा गोव्यातूनच येऊ शकतो.