*गोवा पर्यटनाच्या सुधारित धोरणांतर्गत महिलांच्या नेतृत्वाखालील ग्रामीण होमस्टेना मिळणार २ लाखांचा निधी : पर्यटन मंत्री रोहन ए. खंवटे*
*पर्वरी, २८ जुलै २०२५*: ग्रामीण महिलांना सक्षम बनवण्यासाठी आणि अंतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी एक मोठे पाऊल उचलताना, पर्यटन मंत्री श्री रोहन ए. खंवटे यांनी घोषणा केली आहे, की स्थानिक समुदायासमोरील प्रमुख आव्हानांना तोंड देण्यासाठी गोव्याच्या होमस्टे आणि बेड अँड ब्रेकफास्ट धोरणात सुधारणा केली जात आहे. अनेक ग्रामीण कुटुंबांसाठी आर्थिक अडचणी निर्माण करणाऱ्या आधीच्या रचनेत बदल करून होमस्टे स्थापन करण्यासाठी, पात्र अर्जदारांना आता २ लाख रुपयांचे थेट अनुदान दिले जाईल.
यासंदर्भात माध्यमांना संबोधित करताना मंत्री खंवटे म्हणाले, की “मूळ धोरणात लाभार्थ्यांना प्रथम गुंतवणूक करण्याची आणि नंतर रक्कमेचा दावा करण्याची आवश्यकता होती, जे ग्रामीण कुटुंबांमधील महिलांसाठी व्यावहारिक नव्हते. त्यांच्या अभिप्रायाच्या आधारे आम्ही हे धोरण समावेशक व सुलभ करून महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवण्यासाठी आवश्यक ते बदल केले आहेत.”
हे सुधारित धोरण मालकाच्या निवासस्थानात १ ते ६ भाड्याने घेण्यायोग्य असलेल्या खोल्याना विशेषतः पेडणे ते काणकोण पर्यंतच्या ग्रामीण भागातील होमस्टेना लागू आहे. गोव्यात नोंदणीला परवानगी असली तरी धोरणाचा ग्रामीण भाग जपला जाईल याची खात्री करण्यासाठी, हे प्रोत्साहन केवळ बिगर-किनारी, बिगर-शहरी क्षेत्रांपुरते मर्यादित असेल.
श्री खंवटे यांनी भर दिला, की हा उपक्रम महिला सक्षमीकरणासाठी खोलवर रुजलेला आहे, कारण होमस्टे प्रामुख्याने घरातील महिला व्यवस्थापित करतील. “हे धोरण केवळ आपल्या पर्यटन परिसंस्थेत आणखी एक इन्व्हेंटरी जोडण्याबद्दल नसून उपजीविकेच्या संधी निर्माण करणे, सांस्कृतिक वारसा जतन करणे आणि ग्रामीण महिलांना समुदाय-आधारित पर्यटनात नेतृत्वाची भूमिका देण्याबद्दल आहे,” असे ते म्हणाले.
विधानसभेचे चालू अधिवेशन संपल्यानंतर पर्यटन खाते यासाठीची अर्ज प्रक्रिया सुरू करेल. सुरुवातीच्या टप्प्यात, या योजनेअंतर्गत १०० होमस्टेना पाठिंबा दिला जाईल. या ग्रामीण निवासस्थानांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची कार्यात्मक तयारी सुधारण्यासाठी खात्याने एअर बीएनबी आणि मेक माय ट्रिप सारख्या माध्यमांसह विद्यमान सामंजस्य करार मजबूत करण्याची योजना आखली आहे.
“गोव्याच्या सर्व भागात होमस्टेचे भौगोलिक वितरण योग्य प्रकारे व्हावे, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. याद्वारे पर्यटन अधिक समावेशक होईल आणि पर्यटक गोव्यातील जीवनाशी अधिक खोलवर जोडले जातील तसेच स्थानिक समुदायाचा विकास होईल,” असे मंत्री खंवटे यांनी पुढे सांगितले.
हा उपक्रम सरकारच्या व्यापक अशा पुनरुत्पादित पर्यटन दृष्टिकोनाचा एक भाग आहे. जो जबाबदार पर्यटन पद्धतींद्वारे गोव्याच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक परिसंस्था पुनर्संचयन, समृद्ध आणि सक्षम करण्याचा प्रयत्न करतो.