म्हापसा / प्रतिनिधी
हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून चार ते पाच बेकायदा ‘स्क्रॅप यार्ड ‘ कार्यरत असताना पंचायतीच्या दृष्टीक्षेपात एकही स्क्रॅप यार्ड नसल्याची व त्यांची कसलीही नोंद नसल्याची माहिती हणजूण कायसुव पंचायत सचिव तथा माहिती अधिकारी धर्मेंद्र गोवेकर यांनी दिली आहे.
पंचायत सचिवाने माहिती हक्क कायद्याअंतर्गत विचारलेल्या अर्जाला दिलेल्या माहिती नुसार या पंचायत क्षेत्रात एकही स्क्रॅप यार्ड नाही, असल्यास एकही स्क्रॅप यार्ड पंचायतीकडे नोंद नाही, त्यामुळे पंचायत त्यांच्याकडून एकही पैशाचा कर स्वीकारत नाही.पंचायतीने कोणत्याही स्क्रॅप यार्ड ना परवानगी दिलेली नाही, त्यामुळे पंचायतीला कोणतेही उत्पन्न या स्क्रॅप यार्डवाल्याकडून मिळत नाही. स्क्रॅप यार्ड असल्यास ते कोणाच्या जमिनीत आहेत व कोठे आहेत याची पंचायतीला कल्पना नाही अशी माहिती देऊन आश्चर्यचा धक्का दिला आहे.
उपलब्ध माहिती नुसार वागातोर पेट्रोल पंपानजीक एक, झरमुड्डी येथे दोन व हणजूण परिसरात दोन स्क्रॅप यार्ड बेकायदेशीर रित्या कार्यरत आहेत. पंचायतीकडे त्यांची नोंद नाही किंवा परवानगीही दिलेली नाही त्यामुळे ते अनधिकृत व बेकायदा ठरतात.असे बेकायदेशीर स्क्रॅप यार्ड सुरु करण्याकरिता स्थानिकांनीच आपल्या जमीनी काही मोबदल्याच्या मोहापाई भाड्याने दिलेल्या आहेत.
हणजूण कायसूव पंचायत क्षेत्रात असलेले हे स्क्रॅप यार्ड पंचायतीच्या व स्थानिक पंचसदस्यांच्या पाठिंब्याने कार्यरत आहेत.यावर कायदेशीर रित्या कारवाई करण्याची गरज असल्याचे येथील समाजसेवक रवी हरमलकर यांनी सांगितले.
पंचायतीकडे कोणत्याही स्क्रॅप यार्ड ची नोंद नाही, तसेच पंचायतिनेही कोणत्याही स्क्रॅप यार्ड ला परवानगी दिलेली नाही, पंचायत क्षेत्रात कोणत्या प्रभागात स्क्रॅप यार्ड आहेत की नाहीत याची आपणाला कल्पना नाही, जर असे स्क्रॅप यार्ड कोठे असतील तर कोणीतरी आपल्या निदर्शनास आणून दिल्यास कारवाई करू असे सरपंच सावियो अल्मेदा यांनी सांगितले.
फोटो …… हणजूण येथे बेकायदेशीर रित्या कार्यरत असलेले स्क्रॅप यार्ड…….. ( रमेश नाईक )