प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा अवमान
रोखण्यासाठी कार्यवाही करावी !
पणजी, १९ जानेवारी – राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता आहे. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्र्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्टही होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्र्र्रध्वजांची विटंबना पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (क्र.१०३/२०११) दाखल करण्यात आली होती. याविषयी सुनावणी करतांना न्यायालयाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाला आदेश दिले.
हिंदु जनजागृती समिती गेल्या १९ वर्षांपासून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवते. या अंतर्गत व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे, हस्तपत्रके वाटणे, भित्तीपत्रके-फ्लेक्स लावणे, स्थानिक केबल वाहिन्यांवर जागृतीपर ध्वनीचित्रफित दाखवणे, रस्त्यांवर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, ‘सोशल मीडीया’द्वारे जनजागृती मोहीम राबवणे आदी कृती केल्या जातात. शाळांतून ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवण्यासाठी, तसेच समितीने या विषयावर जागृती करण्यासाठी विशेष ध्वनीचित्रफित बनवली आहे आणि शासनाची अनुमती मिळाल्यानंतर विविध केबलवाहिन्या, आदी ठिकाणी ही दाखवली जाणार आहे. हिंदु जनजागृती समिती निवेदनाद्वारे शासनाकडे मागणी केली आहे की, शासनाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समिती स्थापन करावी. या समितीमध्ये हिंदु जनजागृती समिती यथाशक्ती योगदान देऊन याविषयावर जागृती करण्यासाठी आपल्याला साहाय्य करेल. जिल्ह्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचे उत्पादन वा विक्री होत असल्यास संबंधित उत्पादकांवर त्वरित कारवाई करावी. या निवेदनाची प्रत पणजी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनाही देण्यात आली आहे.