पणजी – गोव्यातील रस्त्यांची योग्य देखभाल करणे व जनतेला अखंडीत व स्वच्छ पाणी पुरवठा करणे तसेच कश्टकरी कामगारांना वेळेत पगार देणे हे प्रत्येक सरकारचे कर्तव्य असुन, मये येथे खराब रस्ते व अखंडीत पाणी पुरवठ्यासाठी आंदोलन करण्यास तेथील लोकांना तसेच मोपा येथील कश्टकरी कामगारांना आपल्या पगारासाठी आंदोलन करण्यास काळजीवाहू भाजप सरकारने भाग पाडुन आपल्या निष्काळजीपणाचे व असंवेदनशीलतेचे परत एकदा प्रदर्शन केले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरीत यात हस्तक्षेप करुन प्रश्न सोडवावा व अटक केलेल्यांची सुटका करावी अशी मागणी कुंकळ्ळीचे नवनिर्वाचीत आमदार तथा कॉंग्रेसचे सरचिटणीस युरी आलेमाव यांनी केली आहे.
आज मये येथे आंदोलनकर्त्याना झालेली अटक तसेच मोपा येथे कामगारांनी केलेल्या आंदोलनावर प्रतिक्रीया देताना कॉंग्रेस आमदार युरी आलेमाव यांनी भाजप सरकारला असंवेदनशील म्हटले आहे.
रस्त्यांची डागडुजी व अखंडीत पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मयेच्या सरपंच तसेच रहिवाशी व एक छायाचित्र पत्रकार यांना झालेली अटक दुर्देवी असुन, मुख्यमंत्र्यांनी त्वरीत हस्तक्षेप करुन त्या सर्वांची ताबडतोब सुटका करावी अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
आज असंवेदनशील व काळजीवाहू भाजप सरकारचा जनतेप्रती निष्काळजीपणा चालुच असुन, कश्टकरी मोपा विमानतळ बांधकाम कामगारांना पगार न देता उग्र आंदोलन करण्यास सरकारनेच भाग पाडले. मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी व सर्व कामगारांचा पगार त्वरीत फेडण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
कॉंग्रेसचे बहुसंख्य आमदार हे तरुण असुन, आम्ही सर्वजण संघटीतपणे गोमंतकीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यतत्पर राहणार आहोत असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.