वागातोर किनाऱ्यावरील ड्रीमबीच नामक जागेत मागच्या तीन दिवसापासून बेकायदेशीर कोणतेही परवाने नसताना रेव्ह पार्टी सुरू असून किनाऱ्यावर येणाऱ्या सामान्य पर्यटकांना तसेच पहाटेच्या वेळेस चालण्याचा व्यायाम करणाऱ्या स्थानिक नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे. रेव्ह पार्टी सुरू असताना पहाटेच्यावेळी किनाऱ्यावर फिरण्यासाठी येणाऱ्या सामान्य पर्यटकांना किनाऱ्यावर फिरण्यास आयोजकांच्या बाऊन्सर्स कडून मज्जाव केला जातो. रेव्ह पार्टीत सहभागी होणारे पर्यटक किनाऱ्यावर आपली दुचाकी चारचाकी वाहने तर नेतातच पण सकाळी परत जाताना ती सरळ किनाऱ्यावरून चालण्याचा व्यायाम करणाऱ्या व सामान्य पर्यटकांच्या अंगावरून नेतात त्यामुळे चालणाऱ्यांना घाबरून बाजूला व्हावे लागते.
किनाऱ्यावरील ही रेव्ह पार्टी काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून विदेशी नागरिकांच्या सहकार्याने आयोजित करण्यात येत असल्याने तक्रार करण्यास कोणी धजावत नाही. या प्रकारावर पोलिसांनी नियंत्रण आणावे अशी ग्रामस्थांची व सामान्य पर्यटकांची मागणी आहे.