प्राचीन काळी अंगकोर वाट, हम्पी, आदी ठिकाणी भव्य मंदिरे उभी करणार्या राजे–महाराजांनी त्यांचे उत्तम व्यवस्थापन केले होते. या मंदिरांच्या माध्यमातून गोशाळा, अन्नछत्र, धर्मशाळा, शिक्षणकेंद्र चालवून समाजाला मोलाचे साहाय्य केले जात होते. यामुळेच मंदिरांशी हिंदु समाज जोडलेला असे. आता मात्र मंदिरांचे इतके व्यापारीकरण झाले आहे की, ते (शॉपिंग) ‘मॉल’ होऊ लागले आहेत, तसेच तीर्थक्षेत्रांना विकासाच्या नावे पर्यटनस्थळ बनवले जात आहे. हे रोखणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिरांच्या विश्वस्तांनी, तसेच पुरोहितांनी मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन केले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी ‘मंदिरांचे आदर्श व्यवस्थापन’ (दी टेम्पल मॅनेजमेंट) हा अभ्यासक्रम चालू करण्याची महत्त्वपूर्ण सूचना प्रथम हिंदु राष्ट्र संसदेत करण्यात आली. दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाच्या द्वितीय दिनी ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’ याविषयावरील हिंदु राष्ट्र संसदेत विविध मंदिरांचे विश्वस्त, भक्त, अधिवक्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी अभ्यासपूर्ण विचार व्यक्त केले. या संसदेत सभापती म्हणून ओडिशा येथील श्री. अनिल धीर, उपसभापती म्हणून हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ, तसेच सचिव म्हणून हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी कामकाज पाहिले.
अडीच तास चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर प्रथम हिंदु राष्ट्र संसदेत ‘हिंदूंची मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त करून ती भक्तांच्या ताब्यात देण्यात यावीत’, ‘मंदिरात तेथील कामकाजासाठी केवळ हिंदूंचीच नियुक्ती करण्यात यावी’, ‘मंदिर परिसरात मद्य, मांस यांना बंदी असावी, तसेच अन्य धर्मियांच्या प्रसारास बंदी असावी’, असे प्रस्ताव संमत करण्यात आले. याला ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’ च्या गजरात उपस्थित धर्मनिष्ठांनी अनुमोदन दिले.
प्रारंभी विषय मांडतांना उपसभापती पू. सिंगबाळ म्हणाले, ‘‘आज सरकारीकरण झालेल्या प्रत्येक मंदिराच्या देवनिधीचा गैरवापर होतांना दिसतो. त्याचा विनियोग योग्य प्रकारे होण्यासाठी मंदिरांचे सुव्यवस्थापन होणे फार महत्त्वाचे आहे.’’ अमरावती येथील ‘रामप्रिया फाऊंडेशन’च्या अध्यक्षा रामप्रियाश्री (माई) अवघड म्हणाल्या, ‘‘भारत देशाचा इतिहास युवकांपर्यंत पोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी लहान मुलांना, तरुणांना मंदिरांशी जोडण्याची आवश्यकता आहे.’’ सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी मत मांडले की, गोव्यात ज्याप्रकारे मंदिरांनी आदर्श वस्त्रसंहिता लागू केली आहे, त्याचप्रकारे देशभरातील मंदिरांमध्येही ती लागू करणे आवश्यक आहे. या वेळी अमळनेर (जळगाव) येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री. शरद कुलकर्णी, चांदूरबाजार (अमरावती) येथील ‘गजानन महाराज सेवा समिती’चे ह.भ.प. मदन तिरमारे, नांदेड येथील ‘श्री संत पाचलेगावकर मुक्तेश्वर मंदिराचे अध्यक्ष श्री. सुधाकर टाक यांनी ते मंदिरांचे व्यवस्थापन कशाप्रकारे करतात, ते सांगितले. या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण HinduJagruti या ‘यु–ट्यूब’ चॅनेल द्वारेही केले जात आहे.