युवकांनी शाहू महाराजांप्रमाणे सामाजिक योद्धे व्हावे
…. निधी साहसी
पासै वाताहार
केरी न्यू इंग्लिश हायस्कुल येथे शाहू जयंती व वैश्विक अमलीपदार्थ विरोधी दियानिमित्त परिसंवाद
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे थोर समाज सुधारक आणि सामाजिक क्रांतीचा स्फुल्लिंग जागृत करणारे सामाजिक योद्धे होते. त्यांचा वारसा जपताना आज प्रत्येक तरुणाने सामाजिक योद्धा होऊन आपला समाज आणि राष्ट्राचे रक्षण करण्याची प्राथमिक गरज आहे. गोव्यासारख्या छोट्या सुंदर राज्याला अमलीपदार्थ आणि व्यसनानीं विळखा घातला आहे. त्यापासून स्वतःसोबत इतरांचा कसा बचाव करता येईल यासाठी शाहू महाराजांचा दूरदृष्टीपणा आपल्या अंगी बाणवून युवा पिढीने कार्यरत रहावे असे प्रतिपादन पंजाब येथील समुपदेशक आणि मनोचिकित्सक निधी साहसी यांनी केरी पेडणे येथे केले.
शाहू महाराज जयंती, सामाजिक न्याय दिवस आणि जागतिक अमलीपदार्थसेवन विरोधी दिवस व अवैध तस्करी दिनाचे औचित्य साधून केरी न्यू इंग्लिश हायस्कुलने आयोजित केलेल्या परिसंवादात निधी साहसी यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला.
यावेळी साहसी यांच्यासोबत शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका निषिता आकरकर, सत्यवान हर्जी उपस्थित होते.
गोवा हे जागतिक पर्यटन केंद्र असल्याने युवक अमलीपदार्थांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता अधिक आहे. समुद्री किनारी भागात ही समस्या खूपच जटिल आहे. ड्रग्ससारख्या व्यसनात अडकल्यास वैयक्तिक आयुष्य तर उदवस्त होतेच शिवाय मोठी कौटुंबिक, सामाजिक हानी होते. जे या विळख्यात सापडले त्यांना बाहेर काढून त्यांचे पुनर्वसन करता येते. तसेच या व्यसनांच्या जाळ्यात न अडकता त्याविषयी जागृती करून घेऊन त्यापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल, असे साहसी यांनी पुढे म्हटले.
ईयत्ता ७वी व ८वी आणि ईयत्ता ९वी १०वीच्या मुलांसाठी दोन गटात निधी साहनी यांनी परिसंवादाच्या निमित्ताने मार्गदर्शन केले. यावेळी चैताली कुबल, तन्वी सावळ , सुजित यादव, दिव्यानुर सिंग, उमेरा खान,साध्वी, चैताली रांगणेकर, भक्ती काळोजी, देवयानी हर्जी या विद्यार्थ्यानी अमलीपदार्थ दिन विरोधी जागृतीविषयक भित्तीपत्रकांचे प्रदर्शन केले.
फोटो
शाहू महाराज जयंती आणि जागतिक अमलीपदार्थसेवन विरोधी दिनानिमित्त केरी न्यू इंग्लिश हायस्कुलमध्ये आयोजित परिसंवादात बोलताना निधी साहसी.