वालंकिणी बॉईजने जिंकला पीए जॉर्ज स्मृती चषक
पणजी ः वालंकिणी बॉईज कळंगुट यांनी आल्वारेस ब्रदर्सचा १-० असा पराभव करत पहिल्या अखिल गोवा दोन दिवसीय सेव्हन ए साईड फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंडरडॉग्ज मयडे यांनी पीए जॉर्ज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तांबडी माती मैदान मयडे येथे या स्पर्धेचे आयोजन केले होते.
दोन्ही संघांनी सामन्यांची सुरुवात एका लयीत करताना गोल करण्याचे प्रयत्न केले. पहिले सत्र सुरू होऊन काही मिनिटे झालेली असताना साईश हळर्णकर शानदार चालीवर गोल करत कळंगुटला अपेक्षित सुरुवात करून दिली. आल्वारेस ब्रदर्स यांनी यानंतर सामन्यात पुनरागमनाचा प्रयत्न केला. परंतु, कळंगुटच्या बचावफळीने त्यांना याची संधी दिली नाही. मोईनुद्दीन याने दोन सुरेख प्रयत्न अडवत वालंकिणी बॉईज संघाला आपली आघाडी वाढवू दिली नाही. अंतिम शिट्टी वाजण्यापूर्वी आल्वारेस ब्रदर्सला मिळालेली बरोबरीची संधी त्यांनी दवडली. या स्पर्धेत एकूण ३२ संघांनी सहभाग नोंदविला होता.
हणदोणाचे आमदार ऍड कार्लुस आल्वारेस फरेरा या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी विजेत्या संघाला रोख रुपये २५ हजार व चषक तर उपविजेत्या संघाला रोख १५,००० व चषक प्रदान केला. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून वालंकिणी बॉईजचा साईश हळर्णकर याला गौरविण्यात आले.