महिला काँग्रेसतर्फे ‘प्रियदर्शिनी उडाण’ अंतर्गत महिलांना मार्गदर्शन
पणजी : माजी पंतप्रधान व भारतरत्न श्री. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त गोवा प्रदेश महिला काँग्रेसतर्फे ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या ‘प्रियदर्शिनी उडाण’ या उपक्रमाअंतर्गत कुर्टी-फोंडा येथे सॅनिटरी नॅपकिन वितरण अभियान राबविण्यात आले. महिलांच्या आरोग्य, स्वच्छता व सन्मान यांचे जतन करण्यासोबतच प्रगतिशील दृष्टीकोनातून देशाचे रूपांतर घडविणार्या एका महान नेत्याच्या स्मृतीस ही योजना वाहण्यात आली.
दक्षिण जिल्हाध्यक्ष ममता माबेन यांनी या उपक्रमाचे अल्पावधीत सुसूत्र आयोजन केले. मान्यवर पाहुण्या डॉ. नबिला शेख यांनी महिलांना मासिक पाळीचे आरोग्य, पाळीचे चक्र, संबंधित आजार आणि एकूण आरोग्यासाठी पोषणाचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन केले.
मुख्य पाहुणे, श्री. राजेश वेर्णेकर (सरचिटणीस, जीपीसीसी) यांनी भारतरत्न श्री. राजीव गांधी यांचे देशाच्या विकासातील मोलाचे योगदान अधोरेखित केले आणि महिलांना दैनंदिन जबाबदार्यांसोबत स्वतःच्या आरोग्य व स्वच्छतेला प्राधान्य देण्याची जाणीव करून दिली.
गोवा प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. प्रतीक्षा खलप यांनी दिवंगत पंतप्रधान भारतरत्न श्री. राजीव गांधी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची आठवण करून दिली. महिलांसाठी 33 टक्के आरक्षण व पंचायत राजव्यवस्था अशा ऐतिहासिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणाला गती दिली होती. त्यांनी स्पष्ट केले की ‘प्रियदर्शिनी उडाण’ ही योजना गोव्यातील फोंडा मतदारसंघातून प्रथम सुरू करण्यात आली असून ती लवकरच राज्यातील इतर मतदारसंघांपर्यंत विस्तारित केली जाईल.
ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. अलका लाम्बा यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या राष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत महिला कामगारांना प्रशिक्षण देऊन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्या महिलांनी तयार केलेल्या सॅनिटरी नॅपकिनचे वितरण या योजनेतून केले जाते. हा प्रकल्प महिलांना स्वस्त व स्वच्छ पर्याय उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्यासाठी अर्थपूर्ण रोजगारनिर्मिती करतो. काँग्रेस पक्षाचा ‘कामाच्या सन्मानातून सक्षमीकरण’ हा संकल्प यातून प्रतिबिंबित होतो.
गोवा प्रदेश महिला काँग्रेसने श्री. राजेश वेर्णेकर आणि फोंडा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे मार्गदर्शन व सहकार्याबद्दल आभार मानले. महिला काँग्रेसच्या पदाधिकार्यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून, महिलांच्या हक्क व आरोग्याबाबत काँग्रेस पक्षाच्या तळागाळातील शक्ती आणि अविचल बांधिलकी अधोरेखित झाली.