म्हापसा :शिवोली मतदार संघाचा विकास न करता तो कसा मागासलेला राहील याकडेच आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधीनी पहिले असावे असे एकंदर या मतदार संघातील समस्या पाहता जाणवते अशी प्रतिक्रिया शिवोली मतदार संघातील आम आदमी पक्षाचे उमेदवार ऍड. विष्णू नाईक यांनी सांगितले.
आसगाव येथे घरोघरी प्रचार करताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. गेली साठ वर्षे शिवोली मतदार संघात वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी नेतृत्व केले पण निवडून आलेल्या कोणत्याही नेत्याने मतदार संघातील जनतेकरिता लागणाऱ्या रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लक्ष दिले नाही, मतदार संघचा विकास न करता फक्त स्वतःचा विकास केला. अजून पर्यत येथील जनता रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधापासून वंचित आहे. निवडून आल्यावर या समस्यांची सोडवणूक करण्याकरिता आपण प्राधान्य देणार आहे.
येथील जनतेला बदल हवा असल्याचे घरोघरी प्रचार करताना प्रतिक्रिया ऐकू येतात. मागील लोकप्रतिनिधिनी मतदार संघाच्या विकासाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे येथील जनता सांगते. घरोघरी प्रचार करताना आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असून या वेळी आपला विजय हा निश्चित आहे असा विश्वास विष्णू नाईक यांनी बोलताना व्यक्त केला.